२२ वर्षांनंतरही देसाईगंजला बसस्थानक नाही
By Admin | Updated: January 7, 2015 22:52 IST2015-01-07T22:52:08+5:302015-01-07T22:52:08+5:30
२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे

२२ वर्षांनंतरही देसाईगंजला बसस्थानक नाही
स्वच्छतेचा बोजवारा : रेल्वे फाटकाने डोकेदुखी वाढविली
महेंद्र चचाणे - देसाईगंज
२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे, त्या ठिकाणी भूमिगत पुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शहराचे अनेक प्रश्न सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यामध्ये स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
देसाईगंज शहराला अनेक समस्यांनी ग्रासले असून यामध्ये बसस्थानकाचा अभाव, रेल्वे फाटकामुळे दररोज नागरिकांना तासभर थांबावे लागते. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी तसेच शहराच्या प्रभागांमध्ये स्वच्छतेचा अभाव व वाढते अतिक्रमण या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. परंतु अजुनही या शहराला बसस्थानक मिळालेले नाही. बसस्थानकाच्या इमारतीसाठी कधी आरमोरी मार्गावर तर कधी कुरखेडा मार्गावर जागा निश्चित करण्यात आली, असे सांगण्यात येते. मात्र अजुनही बसस्थानक कुठे होणार या मुद्यावरच शासनाला निर्णय घेता आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगत छोट्या शेडमध्ये बस निवारा सुरू आहे.
भूयारी रेल्वे पुलाचा तिढा
रेल्वे मार्ग शहरातून गेला असल्याने या शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. दक्षिणेकडील बाजारपेठ, शासकीय कार्यालय, स्टेडीयम आहे. तर उत्तरेकडील भागात रहिवासी वस्ती आहे. चंद्रपूर ते गोंदिया या रेल्वे मार्गावर असलेल्या वडसा (देसाईगंज) रेल्वे स्थानक येथून दररोज ५ ते ८ वेळा एक्सप्रेस गाड्या, साध्या प्रवाशी गाड्या व माल गाड्या धावत असतात. प्रत्येक गाडीच्या आवागमनाला १५ ते २० मिनिटांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले जाते. त्यामुळे दक्षिण व उत्तर बाजुला वाहनांची प्रचंड रांग लागते. त्यामुळे दररोज ५ ते ८ वेळा अर्धा ते एक तास वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपूर्वी भूमिगत रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु ते सध्या संथगतीने सुरू आहे. या संदर्भात ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लावा, असे खा. अशोक नेते यांनी रेल्वेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.