उपजिल्हा रूग्णालयाला प्रतिनियुक्तीचे ग्रहण
By Admin | Updated: October 28, 2014 22:57 IST2014-10-28T22:57:01+5:302014-10-28T22:57:01+5:30
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात ड्यूटी लावल्याने येथील आरोग्यसेवा प्रभावीत होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक रूग्णांवर वेळीच

उपजिल्हा रूग्णालयाला प्रतिनियुक्तीचे ग्रहण
कुरखेडा : कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात ड्यूटी लावल्याने येथील आरोग्यसेवा प्रभावीत होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक रूग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ड्यूटी रद्द करून उपजिल्हा रूग्णालयातच कर्तव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात १ अधीक्षक व ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यापैकी ६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र येथील डॉ. परवते यांची पदव्यूत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याने सध्या ते नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तर डॉ. माळाकोळीकर यांची सेवा पूर्णपणे प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात जोडण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम व सुंगनी तज्ज्ञ डॉ. संभाजी ठाकर यांचे सुद्धा सेवा आठवड्यातून एक दिवस प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालयात जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय सेवा प्रभावीत होत आहे. अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बहुसंख्य रूग्णांना उपचारासाठी नाईलाजास्तव गडचिरोली येथे यावे लागत आहे. कुरखेडा रूग्णालयात नेहमीच रूग्णांची उपचारासाठी मोठी वर्दळ असते. कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यासह लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील रूग्णसुद्धा उपचाराकरिता उपजिल्हा रूग्णालयात येतात. त्यामुळे येथील बाह्य रूग्ण विभागात दररोज २५० ते ३०० रूग्ण औषधोपचार घेतात. तर आंतररूग्ण विभागात ५० खाटांची क्षमता असतांनादेखील ६० ते ७० रूग्ण दाखल होत असतात. या रूग्णालयात रूग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर असल्याने रूग्णांना वेळीच उपचार मिळू शकत नाही. परिणामी उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावीत होत आहे.
उपजिल्हा रूग्णालयातील स्त्रीरोग व सुंगनी तज्ज्ञ गडचिरोली येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने कुरखेडा येथे होणाऱ्या प्रसुती शस्त्रक्रिया सुद्धा प्रभावीत होत आहेत. रूग्णांना सुरक्षा उपयोजना म्हणून गडचिरोली येथील रूग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे प्रतिनियुक्तीने प्रभावीत झालेली येथील आरोग्यसेवा पूर्ववत करण्याकरिता प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द करण्यात याव्या, अशी मागणी तंमुसचे अध्यक्ष तलतअली सय्यद, उपसरपंच अशोक कंगाले, ग्रा. पं. सदस्य रोहीत ढवळे, सिराज पठाण, राकेश चव्हाण व नागरिकांनी केली आहे. प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द न झाल्यास आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.