देसाईगंजात लाखाचा दारूसाठा केला नष्ट
By Admin | Updated: June 30, 2017 01:02 IST2017-06-30T01:02:55+5:302017-06-30T01:02:55+5:30
पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांचे आदेशान्वये मुंबई दारुबंदी कायदा १९४९ नुसार,

देसाईगंजात लाखाचा दारूसाठा केला नष्ट
जेसीबीच्या साह्याने दारू बाटला पुरल्या : उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांचे आदेशान्वये मुंबई दारुबंदी कायदा १९४९ नुसार, देसाईगंज पोलीस स्टेशन येथे नोंदविलेल्या गुन्ह्यातील जप्त केलेली दारु राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली व देसाईगंज पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने नष्ट करण्यात आली.
यात प्रामुख्याने सन २०१४-१५ मधील एकूण ११२ गन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या २५ हजार रुपये किंमतीच्या आतील दारुसाठ्याचा समावेश असून यात ९० मिली मापाच्या १६ हजार १४ प्लास्टिक बाटला पोलीस स्टेशनच्या खुल्या आवारात रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आल्या. तर सन २०१६ मधील एकूण १०९ गुन्ह्यातील ७५० मिलीच्या ३०९ बाटला, १८० मिलीच्या २ हजार ५११ बाटला, ६५० मिलीच्या बियरच्या ६१ बाटला, ५०० मिलीच्या बियरच्या २१ बाटल्या खड्ड्यात जेसीबीच्या सहाय्याने दोन पंचासमक्ष पुरुन नष्ट करण्यात आल्या. २०१६ मधील नष्ट करण्यात आलेली दारूची किमतही ७० हजारांच्या वर आहे.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीचे निरीक्षक एस.एस.गुजर, देसाईगंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.