निवडणूक कामास बीएलओंचा नकार

By Admin | Updated: September 17, 2014 23:47 IST2014-09-17T23:47:28+5:302014-09-17T23:47:28+5:30

अधिकाऱ्यांकडून कानउघडणी : घरोघरी जावे लागणार

Denial of BLs for election work | निवडणूक कामास बीएलओंचा नकार

निवडणूक कामास बीएलओंचा नकार

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून आम्हीच काम करायचे का, असा सवाल व मतदानाच्या दिवशी साधे पाणीही पाजत नसल्याची तक्रार करत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला. तक्रारीच्या सुरात सर्वांनीच सूर मिसळविल्याने काहीसे वातावरण तंग झाले; परंतु त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला जाब विचारून कानउघडणी केल्याने अखेर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश राठोड यांनी बोलावली होती. बीएलओ म्हणून प्रामुख्याने महापालिकेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, बैठकीला सुरुवात होताच एका बीएलओने तक्रार करायला सुरुवात केली. आमच्या शाळेत नऊ शिक्षकांपैकी सहा ते सात शिक्षकांना बीएलओचे काम सोपविण्यात आले, मग शाळा कशी चालवायची, असा सवाल करताच त्यांच्या सुरात बाकींच्यानीही सूर मिसळला. याद्यातील चुकांमुळे मतदारांचे पत्ते व घरे सापडत नाहीत, नागरिक व्यवस्थित माहिती न देता अपमानास्पद वागणूक देतात, अशी तक्रार करण्यात आली. मतदारांचे ओळखपत्र वाटप हे काम बीएलओंचे नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काहींनी मतदानाच्या दिवशी दिवसभर उन्हातान्हात बसवून ठेवल्यावर साधी पाण्याचीही व्यवस्था प्रशासनाने केली नाही, अशी तक्रार केली. या साऱ्या तक्रारींशी सर्वच बीएलओ सहमत झाल्याने त्यांनी गलका करायला सुरुवात केली. अखेर तहसीलदार राठोड यांनी निवडणुकीची कामे करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे असल्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत करावीच लागतील, असे सांगितले. तक्रार करणाऱ्या बीएलओ शिक्षकाच्या आजवर केलेल्या कामाचा आढावा घेण्यास राठोड यांनी सुरुवात करताच त्याची बोबडी वळाली. त्यानंतर मात्र सर्वांनी तक्रारीचा सूर बदलत शंका-समाधान करून घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Denial of BLs for election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.