शिवराजपुरात डेंग्यूची लागण
By Admin | Updated: June 28, 2015 02:17 IST2015-06-28T02:17:26+5:302015-06-28T02:17:26+5:30
तालुक्यातील शिवराजपूर येथे गुरूवारपासून नागरिकांना डेंग्यू रोगाची लागण झाली असून आतापर्यंत या गावात १५ डेंग्यूबाधीत रूग्ण आढळले आहेत.

शिवराजपुरात डेंग्यूची लागण
पाच रूग्ण आढळले पॉझिटिव्ह : आतापर्यंत गावात डेंग्यूबाधित १५ रूग्ण
देसाईगंज : तालुक्यातील शिवराजपूर येथे गुरूवारपासून नागरिकांना डेंग्यू रोगाची लागण झाली असून आतापर्यंत या गावात १५ डेंग्यूबाधीत रूग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, पाच रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य व्यवस्था ढासळली असल्याचे दिसून येत आहे.
शिवराजपूर गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये विकास सुरेश दिवटे (२०), अक्षय सुरेश दिवटे (१६), जलील जब्बार शेख (३२), रोशण प्रल्हाद सोनवाने व सुशील वामन साखरकर आदींचा समावेश आहे. दोन रूग्ण गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात तर दोन रूग्ण ब्रह्मपुरी येथे उपचार घेत आहेत तसेच १० रूग्ण देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. देसाईगंजच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये विनोद सोनवाणे (३२), मिलिंद रामटेके (३२), मीनाक्षी बुराडे (२४), अल्का सोनवाणे (१९), विद्या सूर्यवंशी (३६), वैभव झिलपे (१३), औसतराम बरडे (५५), पुरूषोत्तम कार (३०) आदींचा समावेश आहे. जलील शेख (३२) व खर्जाना शेख (२८) हे दोन रूग्ण गडचिरोलीच्या रूग्णालयात तर विकास दिवटे व अजय दिवटे यांना ब्रह्मपुरीच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
शिवराजपूर गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले नाही. या गावात नाली स्वच्छता व औषध फवारणीसुध्दा झाली नाही. परिणामी अस्वच्छतेमुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने डेंग्यूची लागण झाली आहे. शिवराजपूर येथील डेंग्यूबाधीत १५ रूग्ण आढळूनही आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष आरोग्य शिबिर लावण्यात आले नाही. पिण्याच्या स्त्रोतांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले नाही. डेंग्यू रोगाची लागण झाल्याने तालुक्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. (वार्ताहर)
आमदाराची देसाईगंज रूग्णालयाला भेट
शिवराजपूर गावातील अनेक रूग्ण डेंग्यू रोगाने बाधीत असून ते देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी शनिवारी देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूबाधीत रूग्णांची आस्थेने विचारपूस केली. रूग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराची रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
शिवराजपूर गावातील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ शिवराजपूर गावात विशेष आरोग्य शिबिर लावण्यात यावे, तसेच गावात फवारणी करण्यात यावी, डेंग्यूबाधीत रूग्णांवर योग्य औषधोपचार करण्यात यावा, अशा सूचना आमदार क्रिष्णा गजबे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील व वैद्यकीय अधिकारी नरेंद्र खोमा यांना यावेळी दिल्या.