चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ

By Admin | Updated: September 6, 2014 01:55 IST2014-09-06T01:55:07+5:302014-09-06T01:55:07+5:30

चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध आजारांनी थैमान घातले असल्याने दररोज ४० ते ५० रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ भरती होत आहेत.

With dengue in Chamorshi taluka | चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ

चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध आजारांनी थैमान घातले असल्याने दररोज ४० ते ५० रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ भरती होत आहेत. तालुक्यातील ५ ते ६ गावांमध्ये डेंग्यू आजाराची साथ पसरल्याने रूग्ण गडचिरोली, चंद्रपूरच्या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी भरती होत आहेत. चामोर्शीतील ग्रामीण रूग्णालयात दररोज पाच ते सहा डेंग्यूचे रूग्ण दाखल होत आहेत. परिणामी रूग्णालयात रूग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
डेंग्यूच्या तापाचे अनेक रूग्ण रूग्णालयात भरती होत असल्याने अनेकांना प्लेटलेट व रक्ताची आवश्यकता भासत आहे. परंतु ग्रामीण रूग्णालयात या सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना गडचिरोली, चंद्रपूरला रेफर केले जात आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रतिनिधीने भेट दिली असता, रूग्णालयात रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ही गर्दी नित्याचीच बाब आहे. दररोज ४० ते ५० रूग्ण दाखल होतात, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रजीत नागदेवते यांनी सांगितले.
ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची एसबीसी टेस्ट होऊ शकते. परंतु प्लेटलेटची व्यवस्था नसल्याने अनेक रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात रेफर करावे लागत आहे. ब्लड बँक नसल्याने पुरेशाप्रमाणात रक्ताची व्यवस्था अनेक रूग्णांना वेळेवर होऊ शकत नाही. डेंग्यूच्या रूग्णांना शौचास त्रास, रक्त जाणे, काळेडाग पडणे, रक्तवाहिणी फुटणे, असा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कमी झालेले प्लेटलेट वाढविण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर येथे भरती करण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरी यांनी सांगितले. येथील ग्रामीण रूग्णालयात दुर्गम गावातील नागरिक उपचार करण्यासाठी येतात. या रूग्णांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिवाकर यासलवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: With dengue in Chamorshi taluka