अहेरीत संतप्त एसटी कामगारांचे निदर्शने
By Admin | Updated: November 10, 2015 01:59 IST2015-11-10T01:59:45+5:302015-11-10T01:59:45+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या २७ मागण्यासंदर्भात अहेरीच्या आगार व्यवस्थापक ....

अहेरीत संतप्त एसटी कामगारांचे निदर्शने
आगार व्यवस्थापकाच्या विरोधात : २७ पैकी एकाही मागणीवर तोडगा नाही
अहेरी : राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या २७ मागण्यासंदर्भात अहेरीच्या आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांना ३ नोव्हेंबर रोजी मंगळवारला निवेदन दिले होते. या निवेदनावर कर्मचारी शिष्टमंडळाच्या समक्ष सोमवारी चर्चा करण्यात आली. मात्र यावेळी एकही मागणींवर सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एसटी कामगारांनी आगार व्यवस्थापकांच्या विरोधात निदर्शने केली.
एसटी वाहक, चालक कामगार संघटनेच्या वतीने अहेरीचे आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांना २७ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. निवेदन स्वीकारताना समाविष्ट असलेल्या मागण्यांवर ९ नोव्हेंबर रोजी सोमवारला चर्चा घडवून आणण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सोमवारी आगार व्यवस्थापक राखडे यांच्या कक्षात एसटीचे विभागीय कामगार अधिकारी पराग शंभरकर, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे व एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एसटी कामगारांचे रोटेशन पद्धत, विश्रामगृह स्वच्छता तसेच रजेबाबत मंजुरी राहण्याची सुविधा आदींसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेत एसटी कामगारांची एकही मागणी निकाली काढण्यात आली नाही. त्यामुळे एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चर्चा फिसकटली. त्यानंतर आगार व्यवस्थापकाच्या कक्षाबाहेर येवून संतप्त झालेल्या एसटी कामागारांनी आगार व्यवस्थापक राखडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच आगार व्यवस्थापक राखडे यांची अहेरी आगारातून बदली करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.
१७ नोव्हेंबरला एसटी कर्मचाऱ्यांतर्फे अहेरी आगार व्यवस्थापकाच्या तुघलकी धोरणामुळे आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. निदर्शने करताना अहेरी आगारातील बहुसंख्य चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)