कामाची मागणी वाढली

By Admin | Updated: April 9, 2017 01:24 IST2017-04-09T01:24:46+5:302017-04-09T01:24:46+5:30

शेतीची कामे आटोपताच रोहयोच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे.

Demand for work increased | कामाची मागणी वाढली

कामाची मागणी वाढली

हमी योजनेशिवाय पर्याय नाही: धानोऱ्यात सर्वाधिक ७७ हजार मजुरांचे अर्ज
गडचिरोली : शेतीची कामे आटोपताच रोहयोच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात सुमारे ७७ हजार १९९ रोहयो मजुरांनी विविध विभागांकडे कामांची मागणी केली आहे.
जिल्ह्यात उद्योग नसल्याने शेती हाच एकमेव रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे. त्यातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात पीक घेणे शक्य होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतीची कामे संपताच रोजगार हमीच्या कामांची मागणी वाढण्यास सुरूवात होते. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतीची कामे चालतात. त्यानंतर मात्र मार्च ते जून या कालावधीपर्यंत शेतीची काहीच कामे राहत नाही. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर या कालावधीत मोठ्या प्रमाणात रोहयो कामांची मागणी करते. रोहयो विभागालाही मार्च व जून या कालावधीत रोहयो कामांची मागणी वाढत असल्याचा अनुभव असल्याने अगोदरच कामांना मंजुरी देऊन ठेवली जाते. मजुरांची मागणी येताच कामाला सुरूवात केली जाते. मार्च २०१७ या कालावधी गडचिरोली जिल्ह्यातील ७७ हजार १९९ रोहयो मजुरांनी कामाची मागणी केली होती. त्यापैकी बहुतांश मजुरांना रोहयोचे काम उपलब्ध झाले आहे. याच कालावधीत सुमारे ३६ हजार २०० कुटुंबांनी कामाची मागणी केली. त्यापैकी २७ हजार ९०० कुटुंबांना प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने शासनाकडून रोहयो कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. जिल्हा वार्षीक नियोजन समितीच्या अंदाज पत्रकापेक्षाही रोहयोचे अंदाजपत्रक जास्त आहे. मात्र यातील अर्धाही निधी खर्च होत नसल्याची शोकांतीका आहे. त्यामुळे निधी उपलब्ध राहूनही मजुरांना कामापासून वंचित राहावे लागत असल्याची स्थिती आहे. (नगर प्रतिनिधी)

 

Web Title: Demand for work increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.