गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:45+5:302021-02-05T08:51:45+5:30
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत ...

गांधी वॉर्डात फवारणीची मागणी
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कर्जासाठी युवकांची पायपीट कायम
अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे तारण नसल्याचे कारण पुढे करीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. बेरोजगारांना कर्ज मिळून उद्योगनिर्मिती होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.
हातपंप कोरडे पडण्याच्या मार्गावर
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरच्या परिसरातील काही हातपंप व विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. झिंगानूर हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत पाणीटंचाईग्रस्त परिसर आहे.
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळांची वाताहत
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. या पर्यटनस्थळाचा विकास केल्यास मनोरंजनाचे साधन उपलब्ध होऊ शकते.
रामपूर दत्तमंदिर परिसरात सौंदर्यीकरणाची मागणी
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे दत्ताचे आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे; परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. या परिसरात गाढवी नदीवर भगवान शंकराचेही मंदिर आहे.
बसस्थानक परिसरातील वाहने नियंत्रणाविना
गडचिरोली : येथील बसस्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही, तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. पोलीस बंदोबस्ताअभावी बसस्थानक परिसरातील खासगी वाहने रात्री नियंत्रणाअभावी बेवारस राहतात.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सातबारा पुरवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बसफेऱ्या वाढविण्याची मागणी गडचिरोली येथील आगारप्रमुखांकडे करण्यात आली आहे. मूल येथील आगारातूनही दिवसातून एक-दोन फेऱ्या अधिकच्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कठड्यांअभावी मार्गावर अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील अनेक पुलांवर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. थंडीच्या दिवसांत सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. यामुळे पूल ओलांडताना वाहन चुकीने नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलांवर कठडे बांधणे आवश्यक आहे. पुलाच्या जवळची झुडपे तोडणे आवश्यक आहे.
तोट्यांअभावी पाण्याचा अपव्यय सुरूच
देसाईगंंज : नगर परिषदेचे काही ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत. गरीब नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर सार्वजनिक नळ आहेत. मात्र, या एकाही नळाला तोटी नाही. जवळपासच्या सर्वच नागरिकांकडे स्वत:चे नळ आहेत. त्यामुळे या नळांचे पाणी कुणीच भरत नाही. परिणामी, नळ आल्यापासून ते शेवटपर्यंत पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी.
शेतकऱ्यांना कुंपणासाठी काटेरी तार पुरवा
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गांतील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
शहरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवा
अहेरी : शहरात रात्रीच्या सुमारास चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे गस्त वाढवावी.