उद्योगांसाठी जागेची मागणी वाढली
By Admin | Updated: October 15, 2016 01:46 IST2016-10-15T01:46:37+5:302016-10-15T01:46:37+5:30
उद्योजकांना प्रशासनाकडून प्राधान्याने सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये सकारात्मक

उद्योगांसाठी जागेची मागणी वाढली
गडचिरोली : उद्योजकांना प्रशासनाकडून प्राधान्याने सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी उद्योजकांची एमआयडीसीमध्ये जागेची मागणी वाढली आहे. उद्योजकांना जागा उपलब्ध व्हावी, यासाठी वाढीव जागेसाठी प्रयत्न करावा, असे निर्देश एमआयडीसी प्रशासनाला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले.
एमआयडीसी संदर्भात असणाऱ्या विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी बैठकीदरम्यान घेतला. यावेळी एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक जे. बी. संगीतराव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक महेश परिहार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. येणाऱ्या काळात रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विस्तारणार आहे. मुंबईत झालेल्या मेक इन महाराष्ट्रमध्येही गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याची तयारी अनेक उद्योजकांनी दर्शविली होती. या उद्योजकांकडून आता प्रत्यक्ष उद्योग स्थापण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्यामुळे जागेची मागणी वाढली आहे. स्थानिक उद्योजक सुद्धा जागेची मागणी करीत आहेत. उद्योजकांना जेवढी जागा आवश्यक आहे, तेवढी जागा एमआयडीसी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, वाढीव जागेच्या प्रयत्नासाठी आपण सदैव मदत करू, असे आश्वासन बैठकीदरम्यान दिले.
एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग मित्रांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणल्या होत्या. उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशासनाने सहकार्य करण्यास सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. आष्टी येथे सध्या औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वसाहतीची निर्मिती करण्याची तयारी एमआयडीसी प्रशासनाने करावी, अशा सूचना केल्या.
औद्योगिक वसाहतीत जागा घेऊनही मुदतीत उद्योग उभारणीस सुरुवात केली नाही. त्यामुळे ४२ भूखंड परत घेण्याची कारवाई एमआयडीसीने केली आहे. त्यापैकी ४० भूखंडांचे वाटप नव्या उद्योजकांना करण्यात आले आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक जे. बी. संगीतराव यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
४जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष भेटीदरम्यान एमआयडीसीला पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांविषयी उद्योजकांसोबत चर्चा केली. दळणवळण सुविधांचा विस्तार झाला तर एमआयडीसी झपाट्याने विकसित होईल, असा आशावाद नायक यांनी व्यक्त केला. भेटीदरम्यान उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसोबत सुद्धा चर्चा करून त्यांना उद्योजकांकडून देण्यात येणारी मजुरी, उपलब्ध सोयीसुविधांविषयी माहिती जाणून घेतली.