सतीश भोगे यांची मागणी : पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या
By Admin | Updated: April 24, 2016 01:20 IST2016-04-24T01:20:09+5:302016-04-24T01:20:09+5:30
तेलंगणा-महाराष्ट्र सीमेला जोडणारा सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

सतीश भोगे यांची मागणी : पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या
गोदावरीच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात
सिरोंचा : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेला जोडणारा सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश भोगे यांनी केली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावरील गोदावरी नदीवरील तेलंगणाच्या हद्दीतील कन्नेपल्ली गावाजवळ गत चार वर्षांपासून नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. सध्या सदर बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
या पुलामुळे तीन राज्यातील दळणवळण, व्यापार वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. स्व. आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी सिरोंचाला अनेकदा भेटी देऊन परिसरात राहणाऱ्या नद्यांची माहिती जाणून घेत होते. तसेच या भागातील समस्याही जाणून घेत होते. गोदावरील नदीवरील पुलाचे बांधकाम त्यांच्या प्रयत्नामुळेच सुरू झाले, हे सर्वश्रुत आहे.
सिरोंचा तालुका दुुर्गम असताना या भागात अधिकारी बदलीवर येण्यास धजावत नव्हते. अशा स्थितीत स्व. आर. आर. पाटील यांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत. त्यांच्या योगदानामुळेच गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले व सध्या ते बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याने पुलाला स्व. आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी सतीश भोगे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
प्रस्ताव पारित करण्यासाठी सभेत पत्र
गोदावरी नदीवरील पुलाला स्व. आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीकरिता नगरसेवक सतीश भोगे यांनी नगर पंचायतीच्या मासिक सभेत या संदर्भात प्रस्ताव पारित करण्याकरिता पत्र दिले आहे. सिरोंचा तालुका नक्षलग्रस्त व संवेदनशील भाग म्हणून ओळखला जात असतानासुद्धा आर. आर. पाटील पालकमंत्री असताना त्यांनी अनेकदा भेटी देऊन या भागातील नागरिकांच्या समस्या जाणल्या. तसेच गोदावरी नदीवरील पूल मंजूर करण्याकरिता विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच पुलाचे निर्माण झाले आहे. या पुलामुळे महाराष्ट्र- तेलंगणा- आंध्र प्रदेश राज्य जमीन मार्गाने जोडले जाणार आहे.