रोहयोची मागणी वाढली
By Admin | Updated: June 28, 2017 02:22 IST2017-06-28T02:22:43+5:302017-06-28T02:22:43+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत सुमारे १ लाख ७ हजार

रोहयोची मागणी वाढली
नागरिकांची विशेष पसंती : एक लाख कुटुंबांना तीन महिन्यात रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत सुमारे १ लाख ७ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिक इतर रोजगारांपेक्षा रोजगार हमी योजनेच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी शासनाने देशरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. सदर योजनेचे काम अगदी सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सत्ता बदल झाल्यानंतर अनेक योजना बदलल्या. काही योजनांमध्ये अंशत: बदल करण्यात आला. मात्र भाजपा सरकारनेही या योजनेत बदल केला नाही. यावरून या योजनेचे यश दिसून येत आहे.
एप्रिल ते जून २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७ हजार ९९१ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आला आहे. यामाध्यमातून सुमारे ५३ हजार ६०१ कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. ९७० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. ३३६ अपंग नागरिकांनाही सदर रोजगार उपलब्ध झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतीची कामे सुरू राहत नाही. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या भरवशावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढते. रोजगार योजनेचे काम यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहत होते. मात्र या कामात बदल करण्यात आला आहे. आता रोजगार हमीचे काम सकाळीच केले जाते. दिवसभर उन्हाचा फटका मजुरांना बसत नसल्याने मजूर या कामांना विशेष पसंती देत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात मात्र शेतीची कामे सुरू होत आहेत. या माध्यमातून शेतकरी व शेतमजुरांना शेतीचा रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत रोहयो कामांची मागणी कमी होते. हिवाळ्यातही रोहयोच्या कामाची मागणी वाढते.