बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:49+5:302021-02-05T08:51:49+5:30

देसाईगंज येथील शौचालयांची स्वच्छता करा देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ...

Demand for extension of BSNL tower | बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

देसाईगंज येथील शौचालयांची स्वच्छता करा

देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. सदर शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.

पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या

आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला नाही. दर्जा देण्याची मागणी आहे.

खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी

गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात विनापरवानगीने घरांचे बांधकाम

गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दर वर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.

इंटरनेटमुळे बालकांचे पारंपरिक खेळ लुप्त

गडचिरोली : मोबाइल व टीव्हीच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे विटी-दांडू, लंगडी, भोवरा आदी खेळांकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील मुलेही आता टीव्हीसमोरच बसून असल्याचे दिसतात किंवा मोबाइलवरील गेम खेळत राहतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर व शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा

चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी.

सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा

अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज शहरातील नागरिकांना ऐकावा लागत आहे.

बायोगॅससाठी अनुदान वाढविण्याची गरज

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे बायोगॅससाठी अनुदान देण्याची मागणी आहे.

रविवारच्या बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस

गडचिरोली : दर रविवारी शहरात भरणाऱ्या बाजारात मोकाट गुरांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. विक्रेत्यांनी ठेवलेल्या भाजीवरही त्यांची नजर चुकवून ताव मारतात.

पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी

गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंदस्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

देसाईगंजमध्ये पार्किंगची ऐशीतैशी

देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी- कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्याचा व्यापाऱ्यांसोबतच रहदारी करणाऱ्यांनाही फार त्रास होत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात आहे.

डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, अनेक आजार पसरत आहेत. म्हणून डास निर्मूलनासाठी फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.

अवैध लॉटरी केंद्राचा व्यवसाय फोफावला

देसाईगंज : शहरात परवानाप्राप्त लॉटरी केंद्र आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी परवाना नसलेले अवैध लॉटरी केंद्रे खुलेआम सुरू आहेत. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात तत्काळ धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी.

गांधी वॉर्डात फवारणीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत. यातील बहुतांश नाल्या उपसल्या जात नाहीत.

Web Title: Demand for extension of BSNL tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.