सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST2021-02-20T05:43:49+5:302021-02-20T05:43:49+5:30
तृतीय व चतुर्थ श्रेणींतील भरती करावी गडचिराेली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे ...

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी
तृतीय व चतुर्थ श्रेणींतील भरती करावी
गडचिराेली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागांतील तृतीय व चतुर्थ श्रेणींच्या नोकरभरतीवर बंदी घातली; तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.
आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघरे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कैकाडी वस्तीकडे सोयीसुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चार्मोशी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या वस्तीतील नागरिकांकडून हाेत आहे.
वीज तारांनजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये विजेच्या तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘महावितरण’ने वीजतारांलगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विजेचा लपंडाव वाढला
कोरची : कोरची तालुका नक्षलग्रस्त जंगलाने व्याप्त आहे. तालुक्यातील अनेक गावे डोंगरदऱ्यांत आहेत. त्यामुळे जंगलातून विद्युतलाईन गेली आहे. अनेक वर्षांपासून या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या आहे. मात्र, या समस्येची सोडवणूक अद्यापही झाली नाही. याचा फटका नागरिकांना दरवर्षी बसतो. रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सकाळपर्यंत सुरळीत होत नाही.
तलावाच्या नहरात झुडपी जंगल
चामाेर्शी : तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, तलावाच्या नहराची दुरवस्था झाली असून झुडपे वाढली आहेत. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहराच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
श्रावणबाळ लाभार्थ्यांना मानधन द्या
अहेरी : जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून त्यांना तातडीने मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत; मात्र, त्यांना नियमित मानधन देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
बांबूअभावी बुरूड कामगार अडचणीत
आरमाेरी : तालुक्यात बुरूड कामगारांची संख्या बरीच आहे; मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी
देसाईगंज : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.
मैदानी खेळांबाबत जनजागृती गरजेची
कुरखेडा : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळांची गरज आहे.
रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण
गडचिराेली : इंदिरा गांधी चौक ते मूल मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंगसाठी ठेवली जात आहेत. काही दिवसांपूर्वी वाहतूक पाेलिसांनी कारवाई सुद्धा केली होती़ आता मात्र कारवाई थंडावली आहे. या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे. यापूर्वी अनेकदा रस्त्यावरील पार्किंग हटविण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली होती.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंदस्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.
शहरात घरकुलांसाठीची प्रक्रिया संथगतीने
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत फुले वॉर्ड व गोकुलनगर भागाचा डीपीआर तयार करून एक हजारांपेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. शिवाय विवेकानंदनगर, लांझेडा, विसापूर व इतर भागांतील अतिक्रमित व गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या गरजू, गरीब कुटुंबांना घरकुल देण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठीची कार्यवाही कासवगतीने सुरू आहे. अतिक्रमित कुटुंबांना वास्तव्य करीत असलेल्या जागेचा मालकी हक्क न मिळाल्याने शहरातील बऱ्याच कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही.
पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या
मुलचेरा : जिल्ह्यात बऱ्याच जनावरांना लम्पीच्या आजाराने ग्रासले आहे. कोरोनाच्या दहशतीमध्ये येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गावात फिरून पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करावे, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील पशुधनाच्या आरोग्याची देखभाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असते. पशुधनावर लम्पी आजार जडल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी जनावरांवर उपचार करीत आहेत. शासनाने दखल घेऊन त्यांना विमा कवच देणे गरजेचे आहे.
आंतरराज्यीय वाहतूक वाढली
महागाव बूज : शासन व प्रशासनाच्या वतीने अहेरी उपविभागाच्या विकासावर भर दिला जात असून अहेरी तालुक्याच्या वांगेपल्लीनजीक प्राणहिता नदीवर पुलाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. नदीवर पूल झाल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथून आंध्रप्रदेश व तेलंगणाकडे जाता येते. नदीवर पूल झाल्याने चारचाकी व दुचाकीस्वार प्रवासी आंतरराज्यीय प्रवास करीत आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
एटापल्ली : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठरावीक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.