वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:29+5:302021-09-19T04:37:29+5:30
अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याची मागणी गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी
अन्नपदार्थांची विक्री थांबविण्याची मागणी
गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामीण भागांत काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सातत्याने मागणी हाेऊनही कारवाई केली जात नाही.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने घसरून अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.
झुडपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात
धानाेरा : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, यातील बहुतांश गावांतील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सरपणासाठी महिला जंगलात
घाेट : आर्थिकदृष्ट्या गॅस सिलिंडर परवडणारा नाही. तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्यप्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडर तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एटापल्लीतील अनेक शाळा विजेविनाच
एटापल्ली : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सांडपाणी व्यवस्थापनाचे नियाेजन पूर्णत: बदलले आहे.
तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम
चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमा सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.