१४ कोटी ५७ लाखांचा तेंदूपत्ता बोनस वितरित
By Admin | Updated: October 8, 2014 23:25 IST2014-10-08T23:25:06+5:302014-10-08T23:25:06+5:30
सन २०१३ च्या तेंदू हंगामादरम्यान तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना वनविभागाकडून बोनस वितरणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाचही वनविभाग मिळून एकूण १४ कोटी ५७ लाख

१४ कोटी ५७ लाखांचा तेंदूपत्ता बोनस वितरित
पाच वनविभाग : सन २०१३ च्या हंगामातील मजुरांना लाभ
गडचिरोली : सन २०१३ च्या तेंदू हंगामादरम्यान तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना वनविभागाकडून बोनस वितरणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाचही वनविभाग मिळून एकूण १४ कोटी ५७ लाख ३ हजार ४०३ रूपयांचा तेंदू बोनस वितरीत करण्यात आला आहे.
नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल व वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची अर्थव्यवस्था दरवर्षी होणाऱ्या तेंदू हंगामावर अवलंबून असते. तेंदू संकलन हंगामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. कमी दिवसात अधिक उत्पादन मिळवून देणारे स्त्रोत म्हणून तेंदू संकलन हंगामाकडे बघितले जाते. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली व वडसा हे पाच वनविभाग आहेत. सदर पाचही वनविभाग मिळून सन २०१३ च्या हंगामातील १ लाख ८ हजार ७८६ कुटुंब प्रमुखांना एकूण २९ कोटी ६ लाख ८२ हजार ९१४ रूपये बोनसच्या स्वरूपात द्यावयाचे आहे. जिल्ह्यातील पाचही वनविभागाने २०१४ च्या आॅगस्ट महिन्यापासून तेंदू संकलन बोनसचे वितरणाची कारवाई सुरू केली. १५ सप्टेंबरपर्यंत पाचही वनविभाग मिळून ५७ हजार ६१४ कुटुंब प्रमुखांना १४ कोटी ५७ लाख ३ हजार ४०३ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
तेंदूपत्ता बोनस वितरणाची टक्केवारी ५२.९९ इतकी आहे. वनविभागाला पुन्हा १४ कोटी ४९ लाख ७९ हजार ५११ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असल्याने बोनस वितरणाची कार्यवाही मंदावली आहे. यामुळे अनेक तेंदूपत्ता संकलन मजूर बोनसपासून वंचित आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत आलापल्ली वनविभागातील ९०.४५ टक्के मजुरांना बोनस वितरीत करण्यात आले आहे. भामरागड वनविभागातील ७४.५४ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सिरोंचा वनविभागातील २१.३८ टक्के तर गडचिरोली वनविभागातील ३९.३४ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. वडसा वनविभागातील ४१.६३ टक्के मजुरांना बोनसची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सध्य:स्थितीत गडचिरोली वनविभागातील मजुरांना ३९ लाख १८ हजार २४, भामरागड वनविभागातील मजुरांना २ कोटी ८७ लाख ३७ हजार ४३२, सिरोंचा वनविभागातील मजुरांना २ कोटी ७० लाख ३ हजार ५७१ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे.
गडचिरोली वनविभागातील मजुरांना ४ कोटी ५० लाख ९० हजार ४८१ व वडसा वनविभागातील मजुरांना ४ कोटी २ लाख ३० हजार ३ रूपये बोनसच्या स्वरूपात वितरीत करणे शिल्लक आहे. शिल्लक असलेली बोनसची रक्कम वितरणाची कार्यवाही निवडणुकीनंतर गतीने होणार आहे. त्यादृष्टीने वनविभागाने नियोजन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)