नाजुकाने केले आईला साक्षर
By Admin | Updated: April 8, 2015 01:16 IST2015-04-08T01:16:34+5:302015-04-08T01:16:34+5:30
आपल्या आईला इतर मैत्रिणीच्या आईप्रमाणे वाचता येत नाही, याची खंत बालमनाला बोचल्यानंतर आईला साक्षर करण्याचा निर्धार शिवणी (बुज.) येथील सातव्या वर्गात शिकणाऱ्या ...

नाजुकाने केले आईला साक्षर
आरमोरी : आपल्या आईला इतर मैत्रिणीच्या आईप्रमाणे वाचता येत नाही, याची खंत बालमनाला बोचल्यानंतर आईला साक्षर करण्याचा निर्धार शिवणी (बुज.) येथील सातव्या वर्गात शिकणाऱ्या नाजुका अरूण दुमाने या चिमुकलीने केला. आईचा ध्यास व मुलीच्या मदत यामुळे निरक्षर माता साक्षर झाली असून तिला आता चांगले लिहिता व वाचता येत आहे. चिमुकलीच्या या कार्याची परिसरातील पालकांकडून प्रशंसा केली जात आहे.
शिवणी (बुज.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या नाजुका दुमाने हीची आई निरक्षर असल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बचतगटातील इतर सहकारी महिला बँकेतील बचतगटाचे पैसे काढण्यासाठी स्वत:च अर्ज भरीत होते व त्यावर सहीसुद्धा करीत होत्या. मात्र नाजुकची आई सरिता ही निरक्षर असल्याने या सर्व कामांसाठी तिला इतर महिला किंवा नाजुकाची मदत घ्यावी लागत होती. हे सर्व करूनही सरतेशेवटी मात्र निशानी अंगठा लावावा लागत होता. ही बाब सातव्या वर्गात शिकणाऱ्या नाजुकाला चांगलीच वेदना देऊन गेली.
जिद्दी स्वभावाच्या नाजुकाने एक वर्षापूर्वी आईला साक्षर करण्याचा निर्धार केला. मात्र सुरुवातीला आईने त्यास विरोध दर्शविला. मात्र नाजुकाच्या बालहट्टापुढे आईचे काहीही चालले नाही. शेवटी अ, आ, ई चे पाडे शिकण्यास तयार झाली. सायंकाळी स्वयंपाक बनवतीवेळी व जेवणानंतर काही वेळ नाजुका आपल्या आईला शिकवू लागली. एक वर्ष सातत्यपूर्ण लिहिणे व वाचण्याचा सराव केल्यानंतर आता नाजुकाच्या आईला लिहिता व वाचता येत आहे. त्यामुळे सरिताला आर्थिक व्यवहारांसाठी आता इतर महिलांची गरज राहिली नसून ती स्वावलंबी बनली आहे. (प्रतिनिधी)