पुलावर कठडे लावण्यास विलंब
By Admin | Updated: November 13, 2015 01:25 IST2015-11-13T01:25:50+5:302015-11-13T01:25:50+5:30
पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर....

पुलावर कठडे लावण्यास विलंब
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : पावसाळ्यानंतर दोन महिने उलटले; अपघाताची शक्यता
आष्टी : पावसाळा संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु गडचिरोली- चंद्रपूर सीमेवर आष्टीनजीक वैनंगगा नदीवर असलेल्या पुलावरील पावसाळ्यापूर्वी काढलेले कठडे अद्यापही लावण्यात न आल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलावर कठडे लावण्याचे काम करीत असते. परंतु यंदा संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आष्टी- गोंडपिंपरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी करण्यात आले. सदर पूल ठेंगणा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहते. परिणामी अनेकदा सदर मार्ग बंद असतो. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलावरील लोखंडी कठडे काढले जाते. पावसाळा संपेपर्यंत कठड्यांशिवाय या मार्गाने पुलावरून वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. अहेरी- चंद्रपूर मार्गावर असलेल्या या पुलावरून दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. एसटी महामंडळाच्या बसेस, बांबूची वाहतूक करणारे ट्रक, ट्रेलर यासह अन्य जड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे पुलावरून दुचाकी वाहनधारकांना सावकाश वाहन चालवावे लागते. पुलांवर कठड्यांअभावी अनेकदा अपघात घडले आहेत. ट्रक, सुमो यासह दुचाके वाहने नदीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर लगेच कठडे लावणे गरजेचे होते. मात्र याकडे सांबाविचे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)