बालरूग्णाच्या रक्त तपासणीत विलंब
By Admin | Updated: February 4, 2017 02:16 IST2017-02-04T02:16:50+5:302017-02-04T02:16:50+5:30
माझ्या मुलीची प्रकृती ठिक नसल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात १९ जानेवारीला दाखल करण्यात आले.

बालरूग्णाच्या रक्त तपासणीत विलंब
जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार : अनेक कर्मचाऱ्यांकडून वेळकाढूपणाचे धोरण
गडचिरोली : माझ्या मुलीची प्रकृती ठिक नसल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात १९ जानेवारीला दाखल करण्यात आले. औषधोपचार सुरू असतानाही पूर्वीच्या तुलनेत माझ्या मुलीची प्रकृती अधिक ढासळली. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रक्त तपासणीकरिता नमुने घेण्यात आले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून येथील प्रयोगशाळेत रक्ताची तपासणी करण्यात आली नाही. रक्त तपासणीत प्रचंड विलंब होत आहे, असा आरोप चामोर्शी तालुक्याच्या तळोधी मो. येथील रूग्णाचे वडिल मिलिंद मेडपीलवार यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.
माझ्या मुलीला निमोनिया कपचा त्रास असल्याने आपण १९ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. ठवरे यांच्याकडून नियमित तपासणी व परिचारिकांकडून औषधोपचार सुरू झाले. रूग्णास दररोज इंजेक्शन लावले जात आहे. मात्र प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडतच चालली आहे. तीन दिवसापूर्वी माझ्या मुलीच्या नाकातून रक्त येऊ लागले होते. तसेच शौचातूनही रक्त जात होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीकरिता रक्तनमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र दुसऱ्याही दिवशी रिपोर्ट प्राप्त न झाल्याची माहिती आपणास मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन विचारणा केली असता, रिपोर्ट घ्यायला कोणीच आले नाही, असे सांगण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास बालरूग्ण कक्ष नऊ मधील उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर रिपोर्ट निरंक असल्याने क्रॉस करून पाठविल्याचे आपणास सांगितले, असे मेडपीलवार यांनी म्हटले आहे.
शंका बळावल्याने आपण पुन्हा प्रयोगशाळेत जाऊन रिपोर्टबाबत विचारणा केली असता, तेथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मैदमवार यांनी चौकशी केली. यावेळी रक्त नमुन्याची तपासणी झाली नाही, असे दिसून आले. वेळकाढूपणाच्या धोरणामुळे येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत आहे, असे मेडपीलवार यांनी म्हटले. रूग्णालय प्रमुखांनी प्रयोगशाळा व इतर सर्व विभागाकडे बारकाईने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
मिलिंद मेडपीलवार यांच्या १० महिन्याच्या मुलीला १८ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बालरूग्ण विभागात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी सदर बालिकेचे रक्त नमुने तपासणी करण्यात आली. याशिवाय एक्सराही काढण्यात आला. सर्व रिपोर्ट निगेटीव्ह होते. मात्र पुन्हा ताप आल्याने रक्त तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. सदर बालिकेवर योग्यरित्या औषधोपचार सुरू आहे. वय कमी असल्याने सदर रूग्ण औषधोपचाराला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. सदर बालिकेच्या औषधोपचाराकडे परिपूर्ण लक्ष पुरविले जाईल.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय गडचिरोली