डीएफओंच्या आदेशाची अवहेलना
By Admin | Updated: July 30, 2016 01:51 IST2016-07-30T01:51:14+5:302016-07-30T01:51:14+5:30
भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रातील तत्कालीन स्वच्छक पदावर कार्यरत के. के. सहारे यांची भामरागड ....

डीएफओंच्या आदेशाची अवहेलना
प्रथम अपील दाखल : माहिती देण्यास गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयाची टाळाटाळ
आलापल्ली : भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रातील तत्कालीन स्वच्छक पदावर कार्यरत के. के. सहारे यांची भामरागड वन विभागात विविध देयके प्रलंबित होती. सदर देयके निकाली काढण्याकरिता त्यांनी उपवनसंरक्षक भामरागड यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात कार्यपूर्तीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश उपवनसंरक्षकांनी गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयास दिले. मात्र यावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने उपवनसंरक्षकांच्या आदेशाची अवहेलना होत आहे.
के. के. सहारे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) भामरागड वन विभाग आलापल्ली यांच्याकडे अपील केली आहे. के. के. सहारे सध्या आलापल्ली वन विभागातील मार्र्कं डा (कं.) वनपरिक्षेत्रात वाहनचालक या पदावर कार्यरत असून यापूर्वी ते भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रात स्वच्छक पदावर कार्यरत होते. या कालावधीत त्यांची विविध प्रकारची सात देयके भामरागड वन विभागाकडे प्रलंबित होती. त्यामुळे सदर देयके निकाली काढण्याकरिता उपवनसंरक्षक भामरागड यांच्याकडे मागणी केली असता, यापैकी निलंबन कालावधीमधील उर्वरित वेतन १३ महिने ७ दिवसांचे तथा कर्तव्यात हजर असतानाही गट्टाचे तत्कालीन प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गैरहजर दाखवून कपात केलेले पाच महिन्यांचे वेतन गट्टा वनपरिक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पत्र क्रमांक १९७६ तथा १९७७, ७ नोव्हेंबर २०१५ अन्वये गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना यावर तत्काळ योग्य कार्यवाही करून याविषयी कार्यपूर्ती अहवाल उपवनसंरक्षक कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच वन गुन्ह्यातून निर्दोष ठरल्यानंतर सहारे यांचा १३ महिने ७ दिवसांचा निलंबन कालावधी हा सेवा कालावधी समजण्यात यावा, असे आदेश उपवनसंरक्षकांनी निर्गमित करून पुढील कार्यवाहीकरिता गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे अग्रेषित केले होते. परंतु सात महिने उलटूनही तिन्ही आदेशावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. (वार्ताहर)
दोन महिने उलटूनही माहिती दिली नाही
सहारे यांचे वेतन देयक प्रलंबित असल्यामुळे सदरच्या प्रलंबनाविषयीची माहिती माहितीच्या अधिकारान्वये गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागितली. ३० दिवसांच्या कालावधीत सदर माहिती देणे बंधनकारक असतानाही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ती दिली नाही. सध्या अर्ज करून ६८ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र माहिती मिळाली नाही. माहितीच्या अधिकारानुसार दफ्तर दिरंगाई अधिनियमान्वये स्पष्टपणे उल्लंघन होत असून गट्टा वनपरिक्षेत्र अधिकारी शिक्षेस व दंडास पात्र आहेत. ते सदर माहिती देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत सहारे यांनी अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केली आहे.