इटियाडोहच्या पाण्यापासून कोरेगाव परिसर वंचित
By Admin | Updated: April 30, 2016 01:24 IST2016-04-30T01:24:05+5:302016-04-30T01:24:05+5:30
देसाईगंज तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे नद्यावरील नळ योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.

इटियाडोहच्या पाण्यापासून कोरेगाव परिसर वंचित
कोरेगाव/चोप : देसाईगंज तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे नद्यावरील नळ योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. पाण्याची भिषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन इटियाडोह प्रशासनाने नहराद्वारे पाणी सोडले. मात्र सदर पाणी शेतकऱ्यांनी जमीन ओलितासाठी वापरल्याने नदी, नाल्यापर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
पावसाचे प्रमाण यावर्षी कमी झाल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. त्याचबरोबर लहान, मोठे जलस्त्रोत एप्रिल महिन्यातच आटले. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन उन्हाळी धान पिकाची लागवड न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये यासाठी इटिया डोहाचे पाणी सोडण्यात आले. मात्र सदर पाणी बोडधा, कोरेगाव, चोप, शंकरपूर या गावांपर्यंत पोहोचलेच नाही. नहराद्वारे सदर पाणी सरळ आरमोरीपर्यंत पोहोचले आहे. या पाण्याचा उपयोग शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी करीत आहेत. या उद्देशाने पाणी सोडण्यात आले. तो उद्देश साध्य झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी या पाण्याचा दुरूपयोग केला आहे, त्यांच्यावर दंड आकारावा, अशी मागणी चोपचे सरपंच लिला मुंडले, उपसरपंच कमलेश बारस्कर, गरीबदास बाटबर्वे यांनी केली आहे.
नळ योजना पडणार बंद
कोरेगाव चोप परिसरातील अनेक गावांच्या नळ योजना नदी, नाल्यांवर बसविण्यात आल्या आहेत. मात्र नदी, नाले पूर्णपणे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या नदी, नाल्यांवरील योजना बंद पडण्याची स्थिती आहे. त्यामुळे या नदी, नाल्यांना इटिया डोह नहराचे पाणी अडविणे आवश्यक आहे.