कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात घट
By Admin | Updated: July 8, 2014 23:26 IST2014-07-08T23:26:57+5:302014-07-08T23:26:57+5:30
पती किंवा सासरच्या मंडळीकडून केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कमालीची गट आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केला आहे.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात घट
पोलिसांची आकडेवारी वेगळी : महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचा दावा
अभिनय खोपडे / दिगांबर जवादे - गडचिरोली
पती किंवा सासरच्या मंडळीकडून केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कमालीची गट आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केला आहे. मात्र दुसरीकडे मागीलदोन वर्षात पोलीस दप्तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात २७ प्रकरणे भादंविच्या ४९८ अ कलमान्वये दाखल झाले आहे. यातील एका प्रकरणाचा न्यायालयात निपटारा झाला.
पती व सासरच्या मंडळीकडून विवाहित महिलांचा हुंडा व आदी मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर छळ केला जात होता. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व न्यायालयाच्या बाहेर अशा प्रकरणांत तोडगा काढण्यासाठी शासनाने महिला व बालविकास विभागामार्फत प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पोलीस ठाण्याकडे कलम भादंवि ४९८ अ कलमान्वये दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे, असे आकडेवारी गडचिरोली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सन २०१४ या वर्षात गेल्या सहा महिन्यात १५५ प्रकरणे अशा अत्याचाराच्या संदर्भात दाखल झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये पती-पत्नी यांचे समुपदेशन करून त्यांच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, गडचिरोली, देसाईगंज व अहेरी येथे हे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराविषयीची एखादे प्रकरण पोलीस स्टेशनकडे आल्यानंतर सर्वप्रथम ते महिला व मुलांसाठी सहाय्यक कक्षाकडे दाखल केल्या जाते. समुपदेशक पीडित महिलेला योग्य मार्गदर्शन करून कुटुंबिय व तिच्यामध्ये तडजोड करून देण्याचा प्रयत्न करतो. महिलेला आवश्यक असलेले तिचे अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हास्तरावर स्वतंत्र संरक्षण अधिकारी व विधी सल्लागार नेमण्यात आला आहे. हे अधिकारी पीडित महिलेला तिचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करतात, असेही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे प्रमुख जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे मात्र जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढले आहे. २०१२ व २०१३ या दोन वर्षाच्या घटनांचा आढावा घेतल्यास महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१२ मध्ये विनयभंगाचे ३० प्रकरणे, २०१३ मध्ये ५६ प्रकरणे असे एकूण ८६ प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात घडले. २०१२ मध्ये बलात्काराचे १६ तर २०१३ मध्ये बलात्काराचे ३१ प्रकरणे नोंद करण्यात आले. दोनही वर्षाचे मिळून बलात्काराचे ४७ प्रकरणे पोलीस दप्तरी दाखल झाले आहे. महिलांच्या खुनाच्या ९ घटना २०१२ मध्ये घडल्या असून २०१३ मध्ये १० महिलांचे खून झालेत. एकूण १९ घटना जिल्ह्यात झाल्यात. याची पोलीस दप्तरी नोंद आहे. २०१२ या वर्षात महिला अत्याचाराच्या ५५ तर २०१३ मध्ये ९७ घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहे. मागील वर्षात महिला अत्याचाराचे ११६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०१२ मध्ये १६४ गुन्ह्यांची नोंद जिल्ह्यात करण्यात आली होती. ४९८ अ कलमांतर्गत दाखल होणारे प्रकरण पोलिसांकडे जाण्याचे प्रमाण घटल्याचा दावा करण्यात येत असला तरी गडचिरोली जिल्ह्यात २०१३ मध्ये १९ व २०१४ मध्ये ८ प्रकरण ४९८ कलमान्वये दाखल आहेत. यात पती, सासू, सासरे, ननंद, भासरा यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचेही प्रकरणे आहेत. एका प्रकरणाचा न्यायालयात निकालही लागून निपटारा झाला आहे.