दुष्काळ घोषित करा; आरमोरी पं.स.चा ठराव
By Admin | Updated: December 11, 2015 01:59 IST2015-12-11T01:59:53+5:302015-12-11T01:59:53+5:30
तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुष्काळ घोषित करा; आरमोरी पं.स.चा ठराव
मासिक सभा : इतरही विषयांवर चर्चा
आरमोरी : तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादनातही प्रचंड घट येणार आहे. त्यामुळे संपूर्ण आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा ठराव आरमोरी पंचायत समितीच्या सभेत घेऊन त्याची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
आरमोरी पंचायत समितीच्या सभापती सविता भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेण्यात आली. सभेदरम्यान आरमोरी पंचायत समितीचे सदस्य भिमराव लाडे व इतर सदस्यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करून चर्चा केली. यावर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाच्या ४४ दिवसात केवळ ७७२.३ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. त्यामुळे उत्पादनात ५० टक्क्याहून अधिक घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. नैसर्गिक वातावरणामुळे शेतातील पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा ठराव घेण्यात आला. तालुक्यातील इतरही महत्त्वाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य भिमराव लाडे, नम्रता टेंभुर्णे, नानू चुधरी, सचिन महाजन, सुनिता कुथे, इंदिरा मडावी, संवर्ग विकास अधिकारी एस. डी. सज्जनपवार, सहायक गट विकास अधिकारी एम. टी. निमजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)