उपकेंद्रांवर लवकरच होणार निर्णय
By Admin | Updated: February 9, 2017 01:30 IST2017-02-09T01:30:44+5:302017-02-09T01:30:44+5:30
चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले.

उपकेंद्रांवर लवकरच होणार निर्णय
अम्ब्रीशराव आत्राम यांची माहिती : अहेरीतही विद्यापीठ उपकेंद्र होणार
अहेरी : चंद्रपूर, गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्याने या विद्यापीठाचे उपकेंद्र अहेरी, चिमूर व चंद्रपूर शहर येथे निर्माण करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे.
अहेरी येथे एक उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. यामुळे सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांना सोयीचे होईल. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत्त समितीने निर्णय घेतल्यानंतर हा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. आपणही पालकमंत्री या नात्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भेटून त्यांना याबाबत माहिती दिली. लवकरच या प्रकरणी निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
जागाही उपलब्ध होणार
गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोली शहरात लागणारी जागा वन विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री आत्राम यांनी दिली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.