डिसेंबरमध्ये लाक्षणिक शाळाबंद आंदोलन करणार
By Admin | Updated: November 16, 2015 01:27 IST2015-11-16T01:27:46+5:302015-11-16T01:27:46+5:30
महाराष्ट्रातील शिक्षण संस्था संचालक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये लाक्षणिक शाळाबंद आंदोलन करणार
आमदाराला निवेदन : जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीचा इशारा
गडचिरोली : महाराष्ट्रातील शिक्षण संस्था संचालक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांतर्गत गडचिरोली जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. संस्थाचालक व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात तसेच शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात ९ व १० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात लाक्षणिक शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने संस्थाचालकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोझा वाढविण्यात आला आहे. २८ आॅगस्ट २०१५ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार शिक्षण क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नेमलेल्या शासन समितीचा अहवाल मंजूर न करणे, कला व क्रीडा शिक्षकांचे पदे रद्द करणे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करणे यासारख्या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. निवेदन देताना जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. पंजाबराव देशमुुख शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव प्रा. शेषराव येलेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काचीनवार, संजय मल्लेलवार, किसन पिपरे, पंढरी गुरनुले आदी उपस्थित होते.