१ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९ लाखांचे कर्ज माफ
By Admin | Updated: December 23, 2015 01:42 IST2015-12-23T01:42:38+5:302015-12-23T01:42:38+5:30
शेती लागवडीच्या खर्चासाठी खासगी सावकारांकडे सोन्याचे दागिणे तारण ठेवून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य असल्याचे दिसून आले.

१ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९ लाखांचे कर्ज माफ
सरसकट व्याज माफ : सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता
देसाईगंज : शेती लागवडीच्या खर्चासाठी खासगी सावकारांकडे सोन्याचे दागिणे तारण ठेवून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाने देसाईगंज तालुक्यातील तब्बल १ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९ लाख ६९ हजार रूपयांचे सावकारी कर्ज व्याजासहित माफ केले आहे. यामुळे या शेतकऱ्यांची सावकारांच्या कर्जरूपी पाशातून मुक्तता झाली आहे.
देसाईगंज येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने सावकारी व्यवसायाकरिता २५ सावकारांना रितसर परवाना देण्यात आला आहे. यापैकी ११ सावकारांनी व्यवसाय सुरू केला नाही. तर १४ सावकारांच्या २ हजार १९१ खातेदारांचे प्रस्ताव तालुका व उपनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आले. या खातेदारांच्या कर्जाची रक्कम १२९.३९ लाख रूपये आहे. सदर सर्व प्रकरण संबंधित तलाठ्यांकडे सादर केली असता, १ हजार ३०१ लाभधारक शेतकऱ्यांचे ९३.३७ व ३८७ खातेदारांवर २१.०७ लक्ष रूपयांचे कर्ज होते. मात्र ३८७ कर्ज घेतलेले खातेदार शेतकरी नसल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ५०३ खातेदारांचा ठावठिकाणाच लागला नाही. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीने या खातेदारांचे कर्ज माफ केले नाही. पात्र झालेल्या १ हजार ३०१ शेतकऱ्यांचे ६९.६९ लाख रूपयांचे व्याजासहित सावकारी कर्ज माफ करण्यात आले आहे. (वार्ताहर)