कीटकनाशक फवारलेले पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू
By Admin | Updated: January 9, 2016 01:47 IST2016-01-09T01:47:57+5:302016-01-09T01:47:57+5:30
कीटकनाशक फवारलेल्या शेतातील गवत व पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू झाल्याची घटना ...

कीटकनाशक फवारलेले पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू
वाकडी येथील घटना : पंचनामानंतर केला अंत्यविधी
चामोर्शी : कीटकनाशक फवारलेल्या शेतातील गवत व पीक खाल्ल्याने दोन चितळांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकडी नियत क्षेत्रात सर्वे क्रमांक २६१ मध्ये शुक्रवारी घडली.
वाकडी येथील महारू दिनू वैरागडे यांच्या शेतामध्ये एक नर व एक मादी चितळ मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय चामोर्शी येथे देण्यात आली. त्यानुसार क्षेत्रसहायक एस. व्ही. पैपकवार, वाकडी नियतक्षेत्राचे वनरक्षक एस. पी. जांभुळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून गावातील नागरिकांसमोर पंचनामा केला. निरिक्षणादरम्यान या दोन्ही चितळांचा मृत्यू कोणत्या इसमाने किंवा कुत्र्याने मारल्याने झाला नाही. त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव दिसून येत होता. यावरून सदर चितळांचा मृत्यू कीटकनाशक फवारलेल्या शेतातील पीक किंवा गवत खाल्याने झाला असावा, असे प्रथम निदर्शनास आले. मात्र ज्यांच्या शेतात या चितळांचा मृत्यू झाला. महारू वैरागडे यांच्या व सभोवतालच्या शेतात मात्र कीटकनाशके फवारल्याचे आढळून आले नाही.
नर चितळ अंदाजे तीन वर्ष वयाचे दोन दाती होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर यांच्या उपस्थितीत डॉ. केंद्रे यांनी दोन्ही चितळांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर दोन्ही चितळांचा अंत्यविधी करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)