वैरागडातील जीर्ण टाकी धोकादायक
By Admin | Updated: August 7, 2016 01:42 IST2016-08-07T01:42:33+5:302016-08-07T01:42:33+5:30
येथील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे.

वैरागडातील जीर्ण टाकी धोकादायक
निर्लेखन रखडले : नवीन टाकीतून सुरू आहे पाणीपुरवठा; कायम दुर्लक्ष
वैरागड : येथील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. सदर टाकी कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या टाकीचे निर्लेखन करून अजूनपर्यंत ती पाडण्यात आली नाही.
वैरागड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी वैरागड येथे नळ योजना बांधण्यात आली. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर ७५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. नंतर ही पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस भोयर यांच्या घराजवळ दीड लाख लिटर क्षमतेची दुसरी टाकी उभारण्यात आली. नवीन टाकी उभारून सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने निकामी तसेच जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचे निर्लेखन करून त्याची विल्हेवाट लावली नाही. सदर टाकी कोणत्याही क्षणी कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन ते तीन हॉटेल आहेत. मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी राहते. जुनी पाण्याची टाकी होती तेव्हा सगळ्याच नळधारकांना कमीअधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होत होते. मात्र नवीन टाकीचे बांधकाम झाल्यापासून सखल भागामध्ये असलेल्या नळांना रात्रंदिवस पाणी उपलब्ध होते. मात्र उंच भागावर असलेल्या नळधारकांना पाण्यासाठी नेहमीच पायपीट करावी लागत आहे. (वार्ताहर)