दिवस धरणे आंदोलनाचा!
By Admin | Updated: February 11, 2015 02:03 IST2015-02-11T02:03:51+5:302015-02-11T02:03:51+5:30
जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोली, आयटक संघटना व भारत जन आंदोलनाच्या वतीने ....

दिवस धरणे आंदोलनाचा!
गडचिरोली : जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशन गडचिरोली, आयटक संघटना व भारत जन आंदोलनाच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यासंदर्भात अनेक ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची काही प्रमाणात तारांबळ उडाली. एकूणच आजचा मंगळवार दिवस जिल्हाभरात धरणे आंदोलनाचा दिवस ठरला.
गडचिरोली जिल्हा केरोसीन व स्वस्त धान्य विक्रेता वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी व देसाईगंज येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, केरोसीन नियतन वाढविण्यात यावा, रेशन दुकानाचे भाडे व दोन नोकरांचा पगार व वीज बिलची रक्कम शासनाने द्यावी, रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याचा खर्च देण्यात यावा, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण रेशन व केरोसीन दुकानातून व्हावे, एपीएलधारकांच्या धान्याचे बंद केलेले वितरण पुन्हा सुरू करण्यात यावे, रेशनधान्याचे कमिशन प्रती क्विंटल १०० रूपये करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. गडचिरोली येथील धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष कैलाश शर्मा, अनिल मंडिया, जब्बार सरदार शेख, चंद्रकांत दरडे, चांगदास मसराम, पिंगला निलेकार, रामदास पिपरे, सुरेश बांबोळे, श्रीदेवी खंडारे, यु. आर. उंदीरवाडे, पी. पी. बांबोळे, रूमन ठाकरे, नेहा वैदवार, धनवंता बोरकर, राजेंद्र कुकडकार आदीसह गडचिरोली तालुक्यातील केरोसीन व रेशन दुकानदार सहभागी झाले होते.
चामोर्शी : चामोर्शी येथील आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर वाघाडे, सचिव कमलाकर झाडे, उपाध्यक्ष गोपाल मंडल, कोषाध्यक्ष एकनाथ सातपुते, संजय वडेल्लीवार, मोहन राजापुरे, तोताजी आभारे, प्रफुल मुंगेलवार, नामदेव उंदीरवाडे, अमित यासलवार, सपना बुरांडे, नामदेव चलाख, दमयंती बांबोळे, आशा सोमनकर, कमलाकुमारी दुबे, उमेश आलुरवार, मधू पेदापल्लीवार, रिंकू पालारपवार, गजानन भांडेकर, इश्वरदास चुनारकर आदी उपस्थित होते.
आरमोरी : हिरालाल येरमे, दादाजी माकडे, अनिल किरमे, रमेश सरोदे, ताराचंद कुनघाडकर, नादीर लालानी, रवी निंबेकार यांच्या नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी दुकानदारांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेमुळे दुकानदारांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही केला.
देसाईगंज : येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी आरिफ पटेल, दादाजी भर्रे, अरूण कुंभलवार, राजू बुल्ले, वामन पगाडे, अमरदास बुल्ले आदीसह महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकान संचालिका व केरोसीन विक्रेते सहभागी झाले होते.