एटापल्ली रूग्णालयातील सौरदिवे दूर करणार अंधार
By Admin | Updated: October 18, 2014 23:25 IST2014-10-18T23:25:57+5:302014-10-18T23:25:57+5:30
परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर

एटापल्ली रूग्णालयातील सौरदिवे दूर करणार अंधार
एटापल्ली : परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर दिव्यांनी उजाळणार आहे.
एटापल्ली हे तालुकास्थळ असले तरी या गावापर्यंत पोहोचलेली विद्युत शेकडो किलोमिटर जंगलातून आली आहे. त्यामुळे थोडाही वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यास जंगलातील एखादे झाड कोसळून विद्युत पुरवठा खंडित होतो. सदर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्याच दिवशी जंगलात जाणे विद्युत कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे एकदा खंडित विद्युत पुरवठा किमान २ दिवस पूर्ववत सुरू होत नाही. ही नित्याचीच बाब बनली आहे.
यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने रूग्णालय प्रशासनाने लाखो रूपये खर्चून सौर दिव्यांची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू केले आहे. रूग्णालयातील वार्डांसह बाहेरच्या परिसरातही सौरदिवे लावण्यात आले आहेत. सौरदिवे प्रकाशित होण्याबरोबरच रूग्णालयातील अत्यावश्यक साधनेही चालतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेली सौर उर्जेची प्रचंड यंत्रणा लक्षात घेता हे सहज शक्य होणार आहे. एटापल्ली येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आजपर्यंत विद्युत खंडित झाल्यानंतर अंधाराचा सामना करावा लागत होता. मात्र या यंत्रणेमुळे एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात नेहमीच प्रकाशमान राहील, अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)