दरवडे यांचे कृत्य राजकीय सूडबुद्धीने
By Admin | Updated: February 26, 2015 01:42 IST2015-02-26T01:42:58+5:302015-02-26T01:42:58+5:30
वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेली सर्व कामे नियमानुसारच आहेत. मात्र माजी जि. प. सदस्य केवळराम दरवडे यांनी वारंवार खोट्या व निराधार तक्रारी करीत ...

दरवडे यांचे कृत्य राजकीय सूडबुद्धीने
कुरखेडा : वडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेली सर्व कामे नियमानुसारच आहेत. मात्र माजी जि. प. सदस्य केवळराम दरवडे यांनी वारंवार खोट्या व निराधार तक्रारी करीत याबाबत जाहीर पत्रक छापून अधिकारी व पदाधिकाऱ्यांची नाहक बदनामी केली. गावाच्या विकास प्रक्रियेत अवरोध निर्माण करण्याचा दरवडे यांनी राजकीय सूडबुद्धीने प्रयत्न केला, असा आरोप वडेगाव ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
वडेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत शाळा क्रीडांगण सपाटीकरण, घरकूल योजना, वाढीव पाणीपुरवठा योजना, नाली बांधकाम, कचरापेटी बांधकाम, विसावा बांधकाम आदी कामे नियमानुसार करण्यात आली. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आली, असा खोटा व निराधार आरोप केवळराम दरवडे यांनी करीत पत्रक छापून जाहीररित्या गावात वाटले व पं. स. पदाधिकारी व अधिकारी यांची नाहक बदनामी केली. विकास कामात अडथळा निर्माण करण्याचा दरवडे यांचा प्रकार आहे, असेही पत्रकार परिषदेत ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व कामे नियमानुसार असून या खोट्या तक्रारीसंदर्भात प्रशासनाकडून होणाऱ्या कोणत्याही चौकशीला ग्रा. पं. प्रशासन सामोरे जाईल व त्यांना सहकार्य करेल, अशी माहितीही देण्यात आली. यावेळी केवळराम दरवडे यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. पत्रकार परिषदेला सरपंच निर्मला चंद्रमा, उपसरपंच संजय कोरेटी, सदस्य प्रेमानंद भैसारे, देवलाल कुवर, प्रमोद कुमरे, आसाराम कोरेटी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)