पेट्रोलपंपांवरील मनमानी ठरणार धोकादायक!
By Admin | Updated: December 29, 2014 23:44 IST2014-12-29T23:44:39+5:302014-12-29T23:44:39+5:30
पेट्रोलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. पण याच पेट्रोलचा हजारो लिटरचा साठा ज्या ठिकाणी असतो त्या पेट्रोल पंपांवर मात्र सुरक्षेच्या नियमांच्या

पेट्रोलपंपांवरील मनमानी ठरणार धोकादायक!
मोबाईलबंदीचा फज्जा : खुलेआम मिळते बाटली-डपकीत पेट्रोल, नियमांची पायमल्ली
मनोज ताजने/नरेश रहिले - गोंदिया
पेट्रोलसारख्या अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. पण याच पेट्रोलचा हजारो लिटरचा साठा ज्या ठिकाणी असतो त्या पेट्रोल पंपांवर मात्र सुरक्षेच्या नियमांच्या अक्षरश: चिंधड्या उडविल्या जात आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हा प्रकार स्पष्टपणे दिसून आला. गोंदियातील कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘मार्केटिंग गाईडलाईन्स’चे पालन केल्या जात नाही. याला वेळीच आळा घातला नाही तर ही बाब भविष्यातील एखाद्या मोठ्या अपघातासाठी कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता आहे.
दिवसागणिक दुचाकी-चारचाकी वाहनांची संख्या सर्वत्र वाढत आहे. त्यासोबतच पेट्रोल-डिझेलची मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांची संख्याही गेल्या ४-५ वर्षात झपाट्याने वाढली आहे. पण पेट्रोल पंप चालविताना त्यासाठी असलेल्या नियमावलीचे पालन कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर एखादा अपघात झाल्यास किंवा नियमबाह्यपणे विकल्या जाणाऱ्या खुल्या पेट्रोलचा दुरूपयोग झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मुख्य कंपन्यांचे पेट्रोल पंप जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. या तीनही कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यामुळे त्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसाठी काही मार्गदर्शन तत्वे (मार्केटिंग गाईडलाईन्स) देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन होत आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर असते. मात्र ज्या पद्धतीने त्या नियमांचे पायमल्ली केली जात आहे त्यावरून पेट्रोल पंपांची तपासणी होतच नसल्याचे दिसून येत आहे.
‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये गोंदिया शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अग्रसेन गेटजवळील भारत पेट्रोलियम, वर्दळीच्या जयस्तंभ चौकातील हिन्दुस्थान पेट्रोलियमसह आमगाव मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपवर पाण्याच्या बॉटलमध्ये खुलेआम पेट्रोल खरेदी केले. मात्र कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही किंवा त्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास आढेवेढे घेतले नाही. यावरून तेथील कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने वाहनाशिवाय पेट्रोल देता येत नाही या नियमाची जाणीव आहे की नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.