अरूंद पुलावर धोक्याची वाहतूक
By Admin | Updated: August 14, 2016 01:30 IST2016-08-14T01:30:58+5:302016-08-14T01:30:58+5:30
आघाडी सरकारच्या काळात वैरागड-मानापूर मार्गावरील डोंगरतमाशी घाटावर खोब्रागडी नदीपात्रात पुलाचे बांधकाम करण्यात आले.

अरूंद पुलावर धोक्याची वाहतूक
संरक्षक कठड्यांचा अभाव : खोब्रागडी नदीच्या डोंगरतमाशी घाटावरील वास्तव
वैरागड : आघाडी सरकारच्या काळात वैरागड-मानापूर मार्गावरील डोंगरतमाशी घाटावर खोब्रागडी नदीपात्रात पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या पुलाची रूंदी अत्यंत कमी आहे. सध्या पुलावर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने वर्षभर विशेषत: पावसाळ्यात येथून होणारी वाहतूक धोक्याची ठरत आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पुलावरून बैलजोडी नदीपात्रात पडून बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
आरमोरी तालुक्यातील मानापूर-पिसेवडधा या गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम खोब्रागडी नदीपात्रात करण्यात आले. थोड्याच अंतरावर असताना नियमानुसार डोंगरतमाशी घाटावर नवा पूल बांधण्याची शक्यता कमी होती. परंतु माजी आ. आनंदराव गेडाम यांनी स्वगाव वडेगावला जोडणारा पूल बांधण्यासाठी आघाडी शासनाकडे पाठपुरावा करून पूल बांधकामाला मंजुरी मिळविली. त्यानंतर पुलाचे बांधकामही झाले. या पुलामुळे डोंगरतमाशी, वडेगाव, मेंढा, कुरंडी व परिसरातील गावातील प्रवाशांची सोय झाली. परंतु या पुलाची रूंदी कमी असल्याने त्यातच पुलावर संरक्षक कठडे नसल्याने पुलावरून प्रवास करणे अडचणीचे झाले आहे. नदी भरून वाहत असताना अनेकजण पूल ओलांडण्यास धजावत नाही. त्यामुळे पुलावरून थोडे पाणी असतानाही येथील वाहतूक ठप्प असते. (वार्ताहर)
सोयीचा मात्र दुर्लक्षित पूल
डोंगरतमाशी घाटावरील पूल परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा झाला असला तरी दुर्लक्षामुळे बांधकाम विभागाने पुलावर कठडे लावले नाही. उन्हाळ्यासह पावसाळ्यातही मोठा अपघात घडण्याची येथे शक्यता आहे. त्यामुळे येथील पुलावर संरक्षक कठडे लावावे, अशी मागणी डोंगरतमाशी व या परिसरातील नागरिकांनी साबांविकडे केली आहे.