क्षतिग्रस्त वाहन घटनास्थळीच
By Admin | Updated: January 21, 2017 01:56 IST2017-01-21T01:56:09+5:302017-01-21T01:56:09+5:30
आरमोरीवरून वैरागडकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी होऊन

क्षतिग्रस्त वाहन घटनास्थळीच
वैरागडनजीकची घटना : दोन दिवसांपूर्वी अपघात घडूनही पोलीस अनभिज्ञ
वैरागड : आरमोरीवरून वैरागडकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी होऊन त्याला नागपूर येथील एका रूग्णालयात उचारार्थ भरती करण्यात आले. मात्र ४८ तासांचा कालावधी उलटूनही पोलिसांना या घटनेची माहिती नाही. सदर वाहन अद्यापही घटनास्थळीच पडून आहे.
एम. एच. ३१ बी. बी. ८७२० क्रमांकाच्या वाहनाला बुधवार १८ जानेवारीच्या रात्री अपघात झाला. आरमोरी-वैरागड मार्गावरील पाण्याची टाकी वळणावर सदर वाहनाने झाडाला धडक दिली. त्यामुळे या वाहनाचा पुढील भाग पूर्णत: क्षतिग्रस्त झाला आहे. सदर अपघात इतका जबरदस्त होता की, ज्या झाडाला वाहनाने धडक दिली. ते झाड अर्धेअधिक तुटले आहे. या सदर वाहनाचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूर येथील एका रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल्याची चर्चा वैरागड परिसरात आहे. आरमोरीकडून वैरागडकडे येणाऱ्या वाहनाची दिशा वाहन आरमोरीकडे जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. सदर वाहनावर किशोर असे इंग्रजी व सहारे असे मराठीत रंगीत शब्दात लिहिण्यात आले आहे. मागच्या बाजूला आर्या असे हिरव्या अक्षरात लिहिण्यात आले आहे. याबाबत आरमोरी पोलीस ठाण्याचे वैरागड बिट जमादार सहारे यांच्याशी संपर्क साधला असता, आरमोरी पोलीस ठाण्याला अपघाताबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार अथवा माहिती प्राप्त झाली नाही, असे सांगितले. परंतु ४८ तासांचा कालावधी उलटूनही सदर अपघाताबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच अपघातग्रस्त वाहन घटनास्थळीच पडून आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अपघात कुणाचा याबाबत शंका आहे. (वार्ताहर)