नैसर्गिक आपत्तीने ४९ लाखांचे नुकसान
By Admin | Updated: August 17, 2015 01:19 IST2015-08-17T01:19:12+5:302015-08-17T01:19:12+5:30
एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

नैसर्गिक आपत्तीने ४९ लाखांचे नुकसान
गडचिरोली : एप्रिल महिन्यापासून पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे ४९ लाख रूपयांचे नुकसान झाले असून यामध्ये सहा नागरिक व ७२ पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर २४५ पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस पडला होता. त्या चार दिवसांच्या पावसामुळे जिल्हाभरातील नद्यांना पूर आला होता. त्या कालावधीत सर्वाधिक नुकसान भामरागड, एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने फारसे नुकसान झाले नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या जमिनीमधील खडक अत्यंत दणकट आहे. त्यामुळे भूकंपासारख्या आजपर्यंत तरी घडल्या नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वाधिक नुकसान पावसामुळे होते. गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर अनेक नदी व नाले आहेत. या नदी नाल्यांवर अजूनही पूल बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडताना बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात घडतात.
१ एप्रिल ते १० आॅगस्ट या कालावधीत पावसामुळे एकूण ४८ लाख ७४ हजार ३११ रूपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामध्ये घर पडणे, जनावरे वाहून जाणे आदींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित नागरिकांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसान होताच तीन ते चार दिवसांच्या आतच तहसीलदारांच्या मार्फतीने आर्थिक मदत संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. आतापर्यंत ३२ लाख ७९ हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अजूनही १५ लाखांची मदत देणे शिल्लक आहे. (नगर प्रतिनिधी)