दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना दमछाक
By Admin | Updated: September 27, 2015 01:07 IST2015-09-27T01:07:30+5:302015-09-27T01:07:30+5:30
भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना अनेक शासकीय...

दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना दमछाक
कोण हे नेते? : अनेक अधिकारी, कर्मचारी विचारत होते
गडचिरोली : भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र शोधताना अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आजवर ज्या नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जात होती, त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाचा कधीही फारसा सरकारीस्तरावरून नामोल्लेख झाला नाही. अनेकांना त्यांच्या जयंतीची तारीखही माहीत नव्हती. सरकारी परिपत्रक आल्यामुळे जयंती साजरी करायची आहे, याची कल्पना अनेक अधिकाऱ्यांनी आली. आपल्या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा फोटोही नाही, ही बाब लक्षात आल्यावर फोटो तयार करण्याची हालचाल सुरू झाली. पंडित दीनदयाल उपाध्याय नेमके कोणते यासाठी अनेकांकडे विचारणा होऊ लागली. नेमका त्यांचा योग्य फोटोच तयार झाला पाहिजे, याची काळजीही अधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. अनेक कार्यालयाचे कर्मचारी याबाबत एकमेकांकडे चौकशी करताना दिसून आले. काँग्रेस राजवटीच्या काळात जनसंघाच्या या नेत्याची सरकार दफ्तरी जयंती साजरीच होत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याचीही अनेकांना माहिती नव्हती. काहींनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून दीनदयाल उपाध्याय यांचे छायाचित्र कार्यक्रमासाठी जमवून घेतले, अशी चर्चा आहे. एकूणच काही का होईना, परंतु दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करताना प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे अधिकाऱ्यांमधील घाईवरून दिसून आले.