दिभन्याच्या विठ्ठलभक्तांची २२ वर्षांची वारी

By Admin | Updated: October 26, 2016 02:03 IST2016-10-26T02:03:11+5:302016-10-26T02:03:11+5:30

‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ असे आळवीत विठ्ठल भक्तीत रममान झालेले भाविक कार्तिक पौर्णिमेची वाट पाहत असतात.

Dabhanya Vitthalbankar's 22 year old man | दिभन्याच्या विठ्ठलभक्तांची २२ वर्षांची वारी

दिभन्याच्या विठ्ठलभक्तांची २२ वर्षांची वारी

१ नोव्हेंबरला गावातून प्रस्थान : लालाजी जेंगठे, विनूदास गुरनुले सायकलने गाठणार ७६८ किमीचे अंतर
गडचिरोली : ‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ असे आळवीत विठ्ठल भक्तीत रममान झालेले भाविक कार्तिक पौर्णिमेची वाट पाहत असतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात. विठ्ठलभक्तीत दंग झालेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागली असते. असेच काहीसे भाविक गडचिरोली तालुक्यातील दिभना गावात आहेत. मागील २२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत मग्न होऊन कार्तिकीची वारी न चुकता ते पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे, वारी रेल्वे अथवा बसगाड्यांनी नव्हे तर सायकलने पूर्ण करून आपल्या अथांग विठ्ठलभक्तीचा परिचय पांडुरंगाच्या चरणी देत आहेत.
दिभना या छोट्याशा गावात गेल्या २२ वर्षांपासून पंढरपूर वारीला भाविक जात आहेत. विशेष म्हणजे, येथील ५५ वर्षीय लालाजी जेंगठे व ४० वर्षीय विनूदास सखाराम गुरनुले यांनी २२ वर्षांत एकदाही कार्तिकी एकादशीची वारी चुकवली नाही. नित्यनेमाने ते पंढरपूर वारी करीत आहेत. यंदा कार्तिकी पौर्णिमा १४ नोव्हेंबरला असल्याने लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले १ नोव्हेंबरला दिभनातून सायकलने रवाना होणार आहेत. सलग सात दिवस पंढरपूरपर्यंत मार्गक्रमण करून ७६८ किमीचा पल्ला ते गाठणार आहेत. या प्रवासात लागणारे कपडे, अन्य साहित्यसुद्धा ते घेऊन जाणार असून याची तयारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. विठ्ठलभक्ती दृढ असली तर मोठे संकटही सहज पार करता येतात. वारीसाठी मार्गक्रमण करताना विठ्ठलाच्या कृपेने सर्वकाही ठिक होते, अशी धारणा लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले यांची आहे.

असा राहणार प्रवास
दिभना गावातून १ नोव्हेंबरला प्रस्थान केल्यानंतर चंद्रपूर-घुग्घुस-वणी-पांढरकवडा-पारवा-माहूर-पुसद-कळमनूर-हिंगोली-औंढा-नागनाथ-परभनी-गंगाखेड-करडी-आंबेजोगाई-कळम-येरमाडा-माढा-पंढरपूर या मार्गे लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले सायकलने प्रवास करणार आहेत. त्यामुळे सोबत संपूर्ण सामग्रीही ते नेणार आहेत. मागील २२ वर्षांपासून नित्यनेमाने ते वारी करीत असल्याने गाव परिसरातही विठ्ठलभक्त म्हणून परिचित आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात वाजतगाजत भजनाद्वारे त्यांना वारीसाठी ग्रामस्थांमार्फत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचवणी केली जाते.

Web Title: Dabhanya Vitthalbankar's 22 year old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.