काळीपिवळी टॅक्सीतून सिलिंडरची वाहतूक
By Admin | Updated: August 22, 2016 02:19 IST2016-08-22T02:19:10+5:302016-08-22T02:19:10+5:30
चालत्या वाहनात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. शासनाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी कायदे बनविले असले ...

काळीपिवळी टॅक्सीतून सिलिंडरची वाहतूक
प्रवाशांचा जीव धोक्यात : पोलीस व आरटीओ विभागाचा कानाडोळा
देसाईगंज : चालत्या वाहनात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. शासनाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी कायदे बनविले असले तरी या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार देसाईगंज शहरात दिसून येत आहे. काळीपिवळी टॅक्सी प्रवासी वाहनातून गॅस सिलिंडरची वाहतूक होत असल्याने प्रवाशांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस विभागासह आरटीओ विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
देसाईगंज-कुरखेडा मार्गावर काळीपिवळी टॅक्सीतून सिलिंडरची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. देसाईगंज येथून कुरखेडा, कोरची तालुक्यात गॅस भरलेल्या ज्वलनशिल सिलिंडरची वाहतूक काळीपिवळी टॅक्सीतून सर्रास केली जात आहे. देसाईगंज येथील पटेल कॉम्प्लेक्स परिसरातील दुकानदारांनी काळीपिवळी टॅक्सी चालकांना यासंदर्भात सूचना दिली. प्रवासी व सिलिंडरने भरलेल्या टॅक्सी वाहन दुकानाच्या समोर उभ्या करू नका, अशी ताकीद दिली. मात्र संबंधित काळीपिवळी टॅक्सी चालक दुकानदाराचे म्हणणे समजून न घेता उलट दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याचे चित्रही दिसून आले. येथून ५० फूट अंतरावर उभा असलेल्या वाहतूक पोलीस शिपायाने याबाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले.
प्रवाशांची वाहतूक करीत असलेल्या काळीपिवळी टॅक्सी वाहनातील ज्वलनशिल सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता अधिक असते. मात्र या साऱ्या बाबींकडे काळीपिवळी टॅक्सीचालक पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने देसाईगंज शहरात गॅस सिलिंडरची वाहतूक करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
भंगार टॅक्सी वाहतुकीवर
देसाईगंज शहरातून लगतच्या प्रमुख चार मार्गावर काळीपिवळी टॅक्सीने प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र यातील अनेक काळीपिवळी टॅक्सी भंगार झाल्या असून गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या जीर्ण टॅक्सीने प्रवासी वाहतूक केली जात आहे. अशा टॅक्सीमधूनसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी जनावरांप्रमाणे कोंबून वाहतूक केली जात आहे. अनेक टॅक्सीचे छतही पूर्णत: खराब झाले आहे. टॅक्सीचालकांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत आहे.