सायबर गुन्हेगारीवर आळा बसेल

By Admin | Updated: August 17, 2016 01:44 IST2016-08-17T01:44:47+5:302016-08-17T01:44:47+5:30

नव्या तंत्रासोबत आलेली नवी गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर लॅब उपयोगी ठरणार आहे.

Cybercrime escapes crime | सायबर गुन्हेगारीवर आळा बसेल

सायबर गुन्हेगारीवर आळा बसेल

पालकमंत्र्यांचा आशावाद : पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे उद्घाटन
गडचिरोली : नव्या तंत्रासोबत आलेली नवी गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर लॅब उपयोगी ठरणार आहे. सायबर लॅबच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पोलीस दलाला सक्षमपणे सायबर गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. सायबर लॅबद्वारे सायबर गुन्हेगारीला आळा असेल, असा आशावाद आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
१५ आॅगस्ट रोजी सोमवारला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत अद्यावत सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
सायबर लॅब उभारण्याची सदर योजना विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला अत्याचार प्रतिबंध व सायबर गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत आहे. या सायबर लॅबकरिता सी- डॅशच्या तज्ज्ञांकडून सायबर सेलचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर सायबर लॅबकरिता आवश्यक असणारे आवश्यक असणारे आधुनिक यंत्र सामुग्री व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हँकिंगच्या माध्यमातून पैशाचे गैरव्यवहार, आर्थिक फसवणुकीचे प्रकार संगणकाच्या माध्यमातून होत असून समाजातील सर्व घटकांत, फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक मीडियाच्या वापरातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठविणे आदी प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. असे गुन्हे लवकर उघडकीस यावे, यासाठी सदर लॅबचा उपयोग होणार आहे. न्यायालयात सादर करताना डिजिटल इव्हिडंसचा उपयोग होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

शौर्य पदक जाहीर झालेल्या पोलीस जवानांचा गौरव
गडचिरोली पोलीस दलात नक्षल्यांच्या विरोधात लढणाऱ्या १० शूर जीगरबाज अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाने रविवारी पोलीस शौर्यपदक मंजूर केले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत सहायक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांना पोलीस दलातील गुणत्तापूर्ण सेवेकरिता पीएमएसएस पदक जाहीर करण्यात आले. शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलीस जवान व अधिकाऱ्यांचा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अतुल श्रावण तवाडे, पोलीस शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, प्रविण हंसराज भसारकर, बाबुराव महारू पदा, विनोद मेस्सो हिचामी, पोलीस हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, पोलीस नाईक शिपाई दिलीप ऋषी पोरेटी, दिनकरशहा बालसिंग कोरेटी, देवनाथ खुशाल काटेंगे, संजय लेंगाजी उसेंडी यांचा समावेश आहे.

 

Web Title: Cybercrime escapes crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.