गळा कापून एकाची हत्या
By Admin | Updated: June 16, 2014 23:31 IST2014-06-16T23:31:09+5:302014-06-16T23:31:09+5:30
गाढ झोपेत असलेल्या इसमाची गळा कापून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना काल रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. अज्ञात मारेकरी फरार होण्यास यशस्वी झाले.

गळा कापून एकाची हत्या
देसाईगंज : गाढ झोपेत असलेल्या इसमाची गळा कापून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना काल रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. अज्ञात मारेकरी फरार होण्यास यशस्वी झाले.
हत्या झालेल्या इसमाचे नाव किसन मारोती चंडीकार (५०) रा. गांधीनगर असे आहे. प्राप्त माहिती नुसार किसन चंडीकार हा इसम मासेकरीचा व्यवसाय करीत होता. घटनेच्या वेळी त्याच्या दोन मुली, एक मुलगा व पत्नी दरवाजालगत बाहेरील छपरीत झोपले होते. तर दुसऱ्या छपरात शेळ्या असलेल्या ठिकाणी किसन चंडीकार झोपला असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी घरात प्रवेश करून किसन चंडीकार याच्या मानेवर व हनवटीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस ठाण्यात तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र मारेकऱ्याचा शोध लागला नाही. देसाईगंज पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरूद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अण्णा साहेब मांजरे करीत आहेत.