शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींना हुडकून काढा
By Admin | Updated: March 10, 2015 23:58 IST2015-03-10T23:58:36+5:302015-03-10T23:58:36+5:30
राज्यात सध्या गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात काही संस्थाचालक, सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींना हुडकून काढा
गडचिरोली : राज्यात सध्या गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात काही संस्थाचालक, सामाजिक न्याय व आदिवासी विभागातील दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या प्रकरणात कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, दोषींना हुडकून काढावे व त्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केली आहे.
राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ऐन परीक्षेच्या वेळी शिष्यवृत्ती मंजूर न झाल्यास त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांच्या विरूद्ध कारवाई झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती वाटप प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. राजपत्रित अधिकाऱ्याच्या अनाठायी बहिष्कारामुळे राज्यभरातील मागासवर्गीय पालक, विद्यार्थी व संघटना यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता, शिष्यवृत्ती घोटाळ्यातील दोषींना हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ओबीसी कर्मचारी असोसिएशनने केली आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची काळजी शासनाने घ्यावी, असेही असोसिएशनने म्हटले आहे.