सीटीस्कॅन, स्टेरॉईडचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:20+5:302021-05-06T04:39:20+5:30
रेमडेसिविर, स्टेरॉईड घातकच - रुग्णाच्या छातीत झालेला जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी स्टेरॉईडयुक्त औषधी देणे गरजेचे असते. पण ते दुधारी तलवारीप्रमाणे ...

सीटीस्कॅन, स्टेरॉईडचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
रेमडेसिविर, स्टेरॉईड घातकच
- रुग्णाच्या छातीत झालेला जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी स्टेरॉईडयुक्त औषधी देणे गरजेचे असते. पण ते दुधारी तलवारीप्रमाणे आहे. फुप्फुसात पसरलेला संसर्ग दूर करण्यासाठी ते द्यावे लागते. हळूहळू त्याचे प्रमाण कमी केले जाते. स्टेरॉईडमुळे फुप्फुसाचे रिपेअरिंग होते.
- जंतुसंसर्गाच्या प्रमाणानुसार स्टेरॉईड, रेमडेसिविरचा वापर केला जातो. पण भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसून ते इतर आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात. असे असले तरी रुग्णाचे प्राण वाचवणे हे आधी महत्त्वाचे असल्याने त्याचा वापर केला जातो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.
५० सीटीस्कॅन होतात दररोज
- जिल्ह्यात सध्या दररोज ५०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण त्या तुलनेत सीटीस्कॅनचे प्रमाण दररोज ४० ते ५० एवढेच आहे. यावरून आवश्यक त्याच रुग्णाचे स्कॅनिंग केले जाते हे स्पष्ट दिसते.
- गडचिरोली शहरात अनेक जण खासगी रुग्णालयात परस्पर सीटीस्कॅन करून आपला सीटी स्कोअर किती आहे हे तपासत आहेत. पण गरज नसलेल्या रुग्णांनी या पद्धतीने सीटीस्कॅन करणे त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे.
- जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती जास्त बिघडायला लागली की त्याला जिल्हा मुख्यालयी उपचारासाठी पाठविले जाते. नंतर त्याचे सीटीस्कॅन केले जाते.
एक सीटीस्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
- सीटीस्कॅनच्या वेळी बाहेर पडणारे क्ष-किरण (रेडिएशन) एक्स-रेच्या वेळी निघणाऱ्या क्ष-किरणांपेक्षा ८० ते १४० पटीने जास्त असतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही तेवढेच खोलवर रुजणारे असतात. कोणीही डॉक्टरने सांगितल्याशिवाय स्वत: खासगीरीत्या सीटीस्कॅनचा निर्णय घेणे मूर्खपणाचे ठरत आहे.
(कोट)
- सीटीस्कॅनच्या रेडिएशनचे दुष्परिणाम कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे फिजिशिअनच्या सल्ल्यानुसार ज्या कोरोनाग्रस्त रुग्णाचे सीटीस्कॅन करणे गरजेचे आहे त्यांचेच केले जाते. दुष्परिणाम कधी आणि कोणावर होईल याचे काही निश्चित परिमाण नाही.
- डॉ. राजेश रायपुरे, रेडिओलॉजिस्ट, जिल्हा सामान्य रुग्णालय