गावाचा पार अन् पाटलाची ओसरी नष्ट
By Admin | Updated: November 16, 2015 01:33 IST2015-11-16T01:33:47+5:302015-11-16T01:33:47+5:30
ढोलकीवरील थाप आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा झंकार ऐकायला आला की, अख्खा मोहल्ला एकत्र यायचा.

गावाचा पार अन् पाटलाची ओसरी नष्ट
नंदीबैैलवाल्यांची खंत : आधुनिकतेने ग्रामीण भागातील मौज संपली
प्रदीप बोडणे वैरागड
ढोलकीवरील थाप आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा झंकार ऐकायला आला की, अख्खा मोहल्ला एकत्र यायचा. मग नंदीबैलवाल्यांच्या सूचनेप्रमाणे झुल, चौरंगांनी नटलेला नंदीबैल प्रत्येकाची ओळख सांगायचा. नंदीबैलाचा शहाणपणा पाहून सारेच थक्क व्हायचे आणि सांगायच्या आतच घराघरातून पसाभर दानरूपी धान्य नंदीवाल्यांना प्राप्त व्हायचे. मग दुपारी विश्रांती पाटलाच्या ओसरीत किंवा गावाच्या पारावर अन् भोवती गोळा झालेल्या बायाबापड्यांबरोबर इतकी चर्चा रंगायची, माथ्यावरचा सूर्य कधी उतरणीला गेला याचे भान नसायचे. परंतु आता गावाचा पार अन् पाटलाची ओसरी नष्ट झाली आहे, अशी खंत शंकर नंदीबैलवाल्याने व्यक्त केली.
नोव्हेंबर ते जानेवारी हा कालखंड ग्रामीण भागासाठी सुगीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. वर्षाचे आठ महिने आपल्या स्वगावी राहिलेले नंदीबैलवाले आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता गावाबाहेर पडत असत. गाव, खेड्यापाड्यांत फिरून नंदीबैलामार्फत हुन्नर दाखवून मिळेल ते ग्रहण करायचे. पूर्वी लोककलेतील पांगुळ, गोरखनाथ, बहुरूपी आणि नंदीबैलवाल्यांना मानाचे स्थान होते. दोनवेळच्या जेवणासाठी लाचार होण्याची वेळ त्यांच्यावर येत नव्हती. मात्र आता काळ बराच बदलला. बदलत्या काळाबरोबरच सारेच बदलल्याचे नंदीबैलवाल्याने मत व्यक्त केले. गावाच्या मोक्याच्या ठिकाणी किंवा आठवडी बाजाराच्या ठिकाणी नंदीबैलवाल्यांचा मुक्काम असायचा. दुसऱ्या दिवशी गावाच्या पाटलाला सलाम ठोकून पंचक्रोशीतील गावे फिरून पुढील आठ महिन्यांची व्यवस्था ते करीत असायचे. परंतु आता दिवस बदलल्याने माणसातही बदल झाला. रस्त्याने फिरणाऱ्या अथवा कसरती करणाऱ्यांच्या करामती पाहण्याची वेळसुद्धा लोकांना नाही तर ते कोठून त्यांना दान करणार. पूर्वीचा गावाचा पार व पाटलाची ओसरी या काळात कुठे चालणार, त्यामुळेच आता नंदीबैैलवाल्यांचेही ‘अच्छे दिन’ संपले.
पूर्वीच्या काळातील पार व ओसरीचे महत्त्व
पाटील व जमिनदारांचे प्राबल्य असलेल्या काळात गावातील प्रमुख चौकात पार असायचा. पार म्हणजे, गावातील संपूर्ण लोक एकत्रित येण्याकरिता तयार करण्यात आलेला उंचवटा अथवा मंच होय तसेच या काळात ओसरीलाही अधिक महत्त्व होते. ओसरी पाटलांच्या घरी असायची. या ठिकाणी बाहेरून आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली जायची. या ओसरीत बाहेरून आलेले कलावंत त्याबरोबरच फिरस्थी आश्रय घेत असत. परंतु गावातील पार व पाटलांची ओसरी नष्ट झाल्याने यांना आश्रय मिळणेही दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या काळात पार व ओसरीचे या अनुषंगाने अतिशय महत्त्व होते.