पीक विमा शेतकऱ्यांसाठी लाभदायक
By Admin | Updated: April 9, 2016 01:01 IST2016-04-09T01:01:13+5:302016-04-09T01:01:13+5:30
ओला किंवा कोरड्या दुष्काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. कधी कधी उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

पीक विमा शेतकऱ्यांसाठी लाभदायक
खासदारांचे प्रतिपादन : पंतप्रधान पीक विमा योजना- शेतकरी मेळावा
गडचिरोली : ओला किंवा कोरड्या दुष्काळात पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. कधी कधी उत्पादन खर्चही भरून निघत नाही. या संकटातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने पंतप्रधान पीक विमा योजना- शेतकरी मेळाव्याचे आयोजन ७ एप्रिल रोजी करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप लांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माच्या उपसंचालक प्रीती हिरडकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक कांता मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान कृषी तंत्रज्ञान व बचतगट तसेच कृषी पत पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रदर्शन घडविण्यात आले. प्रदर्शनमध्ये कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, तालुका कृषी अधिकारी, विभागय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना पीक विम्याची माहिती देण्यात आली. पीक विमा योजनेशी संबंधित ध्वनी चित्रफित सर्व शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. कृषी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या विविध घडीपत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्या दरम्यान राजेंद्र भरगड, दिलीप भरसाकडे, तोटावार, डॉ. प्रशांत बुरले, डॉ. विलास अतकरे यांनी मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)