पोर्लाच्या माजी उपसरपंचावर फौजदारी कारवाई प्रलंबितच
By Admin | Updated: June 28, 2015 02:21 IST2015-06-28T02:21:24+5:302015-06-28T02:21:24+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत पोर्ला येथील ग्रामपंचायतीमार्फत पोर्लाचे माजी उपसरपंच बापू फरांडे यांनी २०१२-१३ या वर्षात घरकूल योजनेचा लाभ घेतला.

पोर्लाच्या माजी उपसरपंचावर फौजदारी कारवाई प्रलंबितच
गडचिरोली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत पोर्ला येथील ग्रामपंचायतीमार्फत पोर्लाचे माजी उपसरपंच बापू फरांडे यांनी २०१२-१३ या वर्षात घरकूल योजनेचा लाभ घेतला. घरकुलाचे बांधकाम न करता त्यांनी ग्रामपंचायतीकडून ५० हजार रूपयांच्या धनादेशाची उचल केली. या संदर्भात आपण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम न करता घरकुलाचे अनुदान लाटल्या प्रकरणी फरांडे यांना प्रशासनाकडून अभय मिळत आहे, असा आरोप पोर्ला येथील अण्णा हजारे विचारमंचचे कार्यकर्त विश्वनाथ म्हशाखेत्री यांनी केला आहे.
या संदर्भात म्हशाखेत्री यांनी लोकमतकडे कागदपत्रासह माहिती देताना सांगितले की, इंदिरा आवास योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात पोर्ला ग्रामपंचायतीमार्फत माजी उपसरपंच बापू फरांडे यांना ६८ हजार रूपये किमतीचे घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारचे काम न करता ग्रा.पं.कडून प्रथम २५ हजार व दुसऱ्यांदा २५ असे एकूण ५० हजार रूपयांची धनादेशाद्वारे फरांडे यांनी उचल केली. तक्रारीनंतर २८ आॅगस्ट २०१४ रोजी घरकूल बांधकामाचा पंचनामा व चौकशी करण्यात आली. यावेळी अपूर्ण स्थितीत घरकूल बांधकाम आढळून आले. घरकूल बांधकाम अपूर्ण असताना ग्रा.पं. प्रशासनाने फरांडे यांना ५० हजार रूपयांचा धनादेश कसा काय दिला, असा सवालही म्हशाखेत्री यांनी उपस्थित केला आहे.
पोर्ला ग्रामपंचायती अंतर्गत घरकुलाच्या नियमबाह्य निधी वाटपाबाबत आपण माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली. या तत्कालीन ग्रामसेवक यांनी कोणत्याही प्रकारची मोक्का चौकशी तसेच बांधकामाची पाहणी न करता घरकूल बांधकामाचे खोटे मुल्यांकन करून बापू फरांडे यांना १८ एप्रिल २०१४ रोजी अनुदानाच्या रक्कमेचा धनादेश प्रदान केला. असेही म्हशाखेत्री यांनी लोकमतला सांगितले. मोठ्या प्रमाणात घरकूल घोटाळा होऊनही ग्राम पंचायत, पंचायत समिती व जि.प. प्रशासन कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
बांधकाम न करता घरकुलाचे अनुदान लाटणाऱ्या बापू फरांडे यांच्यावर तत्काळ फौजदारी कारवाई करावी तसेच त्यांना देण्यात आलेल्या ५० हजार रूपये घरकुलाची रक्कम प्रशासनाने परत घ्यावी, अशी मागणी म्हशाखेत्री यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)