विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 01:21 IST2016-04-06T01:21:10+5:302016-04-06T01:21:10+5:30
भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथील शिष्टमंडळाने केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांची ....

विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा
विविध समस्यांवर चर्चा : गडचिरोलीचे शिष्टमंडळ हंसराज अहिर यांना भेटले
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली येथील शिष्टमंडळाने केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. दरम्यान यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपाच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे यांच्यासह बंडू झाडे, विजय सेडमाके, प्रदीप आवळे, एकनाथ निकुरे, गुरूदेव गव्हारे, लोढे, रवी भोयर, यशवंत झरकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांसह विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात याव्या, शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे जेवढे नुकसान होईल, त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतातील रोवणी, नांगरणी व धान कापणी आदी सर्व कामे मनरेगामार्फत करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. विदर्भावर प्रचंड अन्याय झाला आहे. विदर्भाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड अनुशेष वाढला आहे. विदर्भातील सिंचन, नोकरी, उद्योग आदी बाबींचा संयुक्त महाराष्ट्रात राहून विकास होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करून विदर्भातील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी ना. हंसराज अहिर यांच्याकडे करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शिष्टमंडळाला दिले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष गांभीर्याने वेधणार, असेही ना. अहिर यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)