पतसंस्थेच्या माध्यमातून उद्योग निर्मिती व्हावी!
By Admin | Updated: February 18, 2017 01:59 IST2017-02-18T01:59:54+5:302017-02-18T01:59:54+5:30
सहकार क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पतसंस्था प्रगतशील आहे.

पतसंस्थेच्या माध्यमातून उद्योग निर्मिती व्हावी!
अशोक नेते यांचे प्रतिपादन : सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
गडचिरोली : सहकार क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पतसंस्था प्रगतशील आहे. मात्र त्या तुलनेत विदर्भातील पतसंस्था पाहिजे, त्या प्रमाणात प्रगतशील नाही. सहकार क्षेत्र व कायद्याचे संपूर्ण ज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे. शिवाय आॅनलाईन व्यवहार व तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्मिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी, नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था संघ गडचिरोलीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सहकार प्रशिक्षण/कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ क्रेडीट को-आॅपरेटीव्ह सोसायटी फेडरेशनचे संचालक अनिल पाटील म्हशाखेत्री, धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान नागपूरचे माजी प्राचार्य जगदिश किल्लोळ, पतसंस्था संघाचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल वाघरे, भाजपचे पदाधिकारी विलास भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील काम प्रशिक्षणाशिवाय अधिक प्रभावी होऊ शकत नाही. सहकार क्षेत्रातील अपुरे ज्ञान, संचालक मंडळातील समन्वयाचा अभाव, योग्य व्यवस्थापन व नियोजन नसणे यासह अनेक कारणांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पतसंस्थेमार्फत पेट्रोलपंप व इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही पतसंस्थांमार्फत उद्योग निर्मिती होऊन रोजगाराची दालने खुली झाली पाहिजे, असे खासदार नेते यावेळी म्हणाले. याप्रसंगी अनिल म्हशाखेत्री, जगदिश किल्लोळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य खुशाल वाघरे, संचालन प्रा. शेषराव येलेकर यांनी केले. कार्यक्रमाला पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)