वनातून रोजगार निर्मिती व्हावी

By Admin | Updated: July 31, 2016 02:03 IST2016-07-31T02:03:17+5:302016-07-31T02:03:17+5:30

गडचिरोली हा वनसंपदेने संपन्न जिल्हा आहे. रोजगारामध्ये वनांचा वापर कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

To create employment from forests | वनातून रोजगार निर्मिती व्हावी

वनातून रोजगार निर्मिती व्हावी

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : उपवनसंरक्षक उपजीविका पद निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
गडचिरोली : गडचिरोली हा वनसंपदेने संपन्न जिल्हा आहे. रोजगारामध्ये वनांचा वापर कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या वनातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्यासाठी उपवनंसरक्षक उपजीविका पद निर्माण करण्याचा तसेच मत्स्य विज्ञान संशोधन संस्थेच्या रूपात विद्यापीठाचे उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी येथील नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी अनिल गोतमारे आदी मंचावर उपस्थित होते.
जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोणातून वनावर आधारीत उत्पादन आणि त्याबाबत संशोधन होण्यासाठी यंत्रणा निर्माण केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केवळ बैठकांच्या नियोजनावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदाची अडचण असतानाही जे अधिकारी काम करीत आहेत, त्यांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. समिती सदस्यांचा सत्कार डी. बी. खडतकर, सुनिल धोंगडे यांनी केला. जिल्ह्यात नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे संचालन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी अनिल गोतमारे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

मत्स्य व्यवसायासाठी उपकेंद्राचा ठराव मंजूर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून ४ हजार ८५० जलसाठे व मामा तलाव उपलब्ध आहेत. जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेतून तलावाची संख्या वाढल्याने मत्स्य व्यवसायातून रोजगाराची संधी आहे. याबाबत अभ्यास व संशोधन होऊन मासेमारांना मार्गदर्शनासाठी गोंडवाना विद्यापीठामार्फत जिल्ह्यात एक उपकेंद्र निर्माण करावे, असा प्रस्ताव खा. अशोक नेते यांनी मांडला व तो मंजूर करण्यात आला.

सर्वांना गणवेश द्या
सर्व शिक्षा अभियानांतर्गत ओबीसी व खुल्या गटातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यासाठी न.प. व जि.प.ने आपल्या निधीतून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा, अशी सूचना किसन नागदेवे यांनी केली. यास सभागृहाने मान्यता दिली.

डीपीसीतून एक कोटी भरा
देसाईगंज येथे साडेचार एकर जागेवर कला केंद्र उभारण्याची मागणी आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे केंद्र असलेल्या वडसात एकही नाट्यगृह नाही. प्रस्तावित जागेसाठी वनखात्याकडे भरावयाचा एक कोटीचा निधी डीपीसीतून द्यावा, अशी मागणी किसन नागदेवे यांनी केली.

नियोजन आराखडा तयार करा
जिल्हा विकासासाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. यातून रोजगार निर्मिती होण्यासाठी सर्व विभागांनी एक महिन्याच्या आता नियोजनात्मक आराखडा तयार करून सादर करावा, अशी सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली. कॅनल दुरूस्तीचे प्रस्तावही सादर करावे, असे ते म्हणाले.

युरीया खत प्राप्त नाही
आ. क्रिष्णा गजबे यांनी चंद्रपूरवरून गडचिरोली जिल्ह्यास युरीया खत प्राप्त झालेला नाही, असा विषय मांडला. तर आ. मितेश भांगडिया यांनी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावांची नोंद इतिवृत्तात यायलाच हवी, असा मुद्दा मांडला.

 

Web Title: To create employment from forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.