बसस्थानक व कार्यशाळेसाठी बृहत् आराखडा तयार करा
By Admin | Updated: June 19, 2016 01:10 IST2016-06-19T01:10:22+5:302016-06-19T01:10:22+5:30
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक परिवहन व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून अधिकाधिक मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाने बसेस सोडाव्यात

बसस्थानक व कार्यशाळेसाठी बृहत् आराखडा तयार करा
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बससेवेचा घेतला आढावा
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक परिवहन व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून अधिकाधिक मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाने बसेस सोडाव्यात तसेच बसस्थानके व कार्यशाळा यांचा बृहत् आराखडा तयार करून त्याच्या उभारणीचा पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे परिवहन यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याबाबत कळविले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्व संबंधितांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. फासे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील यादीवर असलेल्या १ हजार ५९ गावांमध्ये महामंडळाची बस पोहोचण्याच्या दृष्टीकोणातून कामकाज सुरू आहे. बांधकाम विभागाच्या माहितीनुसार एकूण ४५६ ग्रामपंचायतीत ६७ गावांना जोडणारे रस्ते नाही. मात्र बारमाही संपर्क असणाऱ्या गावांची संख्या १ हजार २२५ इतकी आहे. या सर्व गावापर्यंत एसटी पोहोचावी, असे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. बैठकीत त्यांनी दैनंदिन बसफेऱ्या, बसगाड्यांची स्थिती, चालक-वाहक संख्या आदीचा आढावा घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)ंं
दोन डेपो व सहा बसस्थानकांंसाठी जागेची आवश्यकता
राज्य परिवहन महामंडळाकडे २५० मोठ्या व नऊ मिनी बसेस आहेत. महामंडळाच्या गडचिरोली विभागात सिरोंचा, ब्रह्मपुरी व गडचिरोली हे तीन उपविभाग आहेत. यापैकी गडचिरोली व सिरोंचा येथे डेपो तयार करण्यासाठी महामंडळाला जागेची आवश्यकता आहे. तसेच आलापल्ली, चामोर्शी, आष्टी, एटापल्ली, मुलचेरा व भामरागड या सहा बसस्थानकासाठी महामंडळाला जागा हवी आहे. या सर्व ठिकाणांचा आराखडा तयार करून ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जागा देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नायक बैठकीत म्हणाले.