शहर विकास आराखडा तयार करा
By Admin | Updated: June 13, 2016 02:58 IST2016-06-13T02:58:13+5:302016-06-13T02:58:13+5:30
गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहर विकासाचा आराखडा तयार करा,

शहर विकास आराखडा तयार करा
खासदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश : गडचिरोली शहरात फिरून घेतला आढावा
गडचिरोली : गडचिरोली शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहर विकासाचा आराखडा तयार करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
शनिवारी खासदार अशोक नेते यांनी शहरात फेरफटका मारून शहरातील सोयीसुविधांचा आढावा घेतला. अनेक वार्डांमध्ये नाल्यांचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले. प्रत्येक वार्डामध्ये नाली व रस्ते निर्माण करणे हे नगर परिषदेचे कर्तव्य असतानाही नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नियोजनबध्द कामे न केल्याने शहरात अडचणी वाढल्या आहेत. गटारांची निर्मिती केल्यास शहरातील दुर्गंधीची समस्या दूर होईल. ओपन स्पेसमध्ये बगिचाचे बांधकाम करण्यासाठी उपाययोजना कराव्या. शहराला सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, चारही मार्गावर सार्वजनिक मुत्रीघर, पाण्याची व्यवस्था, वर्दळीच्या ठिकाणी हायमॉस्ट लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, अनिल पोहणकर, रेखा डोळस, शहराध्यक्ष संगीता पिल्लारे, तहसीलदार भोयर, मुख्याधिकारी क्रिष्णा निपाने, बीडीओ पचारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)